उरुळी कांचन, (पुणे) : खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी मुळा- मुठा नदीला सोडण्यात आले होते. त्यामुळे पूर्व हवेलीतील कोरेगाव मूळ-बिवरी येथील मुळा-मुठा नदीवरील जुना कोल्हापूर पद्धतीचा बंधारा लहान असल्याने त्याच्या बाजूला असलेला भराव नदीच्या पाण्याबरोबर वाहून गेला होता.
यामुळे या परिसरातून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. परिसरातील नागरिकांनी व वाहनचालकांनी कोरेगाव मूळचे सरपंच भानुदास जेधे यांच्याकडे भराव टाकून खड्डा बुजवण्याची मागणी केली होती. नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार सोमवारी (ता. 30) सकाळपासून अपघाताचा धोका ओळखून सरपंच भानुदास जेधे यांनी भराव वाहून गेलेल्या ठिकाणी मुरूम व मोठी दगडे भरून रस्ता पूर्ववत करण्यास सुरुवात केली आहे.
भराव वाहून गेलेल्या ठिकाणी मुरूम व मोठी दगडं भरून रस्ता पूर्ववत करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी व वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी माजी सरपंच मंगेश कानकाटे, चेतन कानकाटे, मैफत गोते, मोहन चितळकर, प्रदीप पवार, सोमनाथ साळवे, निलेश डिंबळे, पप्पू घोरपडे, ग्रामपंचायत कर्मचारी, मुकेश कोलते, रवी मदगडे, प्रकश गरमाळे आदी उपस्थित होते.
कोरेगाव मूळ – बिवरी येथील मुळा-मुठा नदीवरील जुना कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण झाल्यावर ६ ते ८ दिवस पाण्याखाली जातो. हा पूल लहान असल्यामुळे शाळेतील मुलांना व परिसरातील नागरिकांना जाण्या-येण्यासाठी खूप त्रास होतो. तसेच या बंधाऱ्यावरून जाणारे शेतकरी व नागरिक यांना अडचण होत होती. तसेच खूप मोठा खड्डा पडल्याने एखादी दुर्घटना घडण्याची शक्यात वर्तवली जात होती.
दरम्यान, पाण्याच्या जास्त प्रवाहामुळे बंधाऱ्याच्या बाजूला असलेला पूर्वेकडील बाजूचा मुरूम वाहून गेला होता. पुलाच्या कडेला मोठं मोठ्या दऱ्या निर्माण झाल्या असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. बिवरी, अष्टापूर, वाडेबोल्हाई, डोंगरगाव या ठिकाणावरून नगर रस्त्याला जाणाऱ्या व येणाऱ्या चारचाकी, दुचाकींचे प्रमाण मोठे आहे.