लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील अभिनव चेतना नागरी सहकारी पतसंस्थेला 2023-2024 या आर्थिक वर्षात संस्थेचा एकुण व्यवसाय 32.49 कोटी झाला आहे. यामध्ये 1.61 कोटी रुपये निव्वळ नफा होऊन संस्थेच्या सभासंदाना सलग 17 व्या वर्षी 15 टक्के लाभांश संस्थेचे अध्यक्ष हेमंत सोपानराव हाडके यांनी जाहीर केला आहे.
लोणी काळभोर येथील अभिनव चेतना नागरी सहकारी पतसंस्थेची 36 वी वार्षिक सर्व साधारण सभा नुकतीच स्व. सोपानराव हाडके सभागृह, दत्तमंदिर, लोणी काळभोर येथे संस्थेचे अध्यक्ष हेमंत सोपानराव हाडके यांचे अध्यक्षतेखाली व उपाध्यक्ष सचिन शिवाजी काळभोर यांचे उपस्थितीत पार पडली. यावेळी वरील माहिती अध्यक्ष हेमंत हाडके यांनी दिली.
उपाध्यक्ष सचिन काळभोर यांनी पतसंस्थेच्या सोनेतारण कर्ज वाटपाची माहिती दिली व ठेवी ठेवण्यास सांगितले. संचालक पांडुरंग काळभोर यांनी थकीत कर्जदारांना थकबाकी रक्कम भरण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे संचालक ज्ञानेश्वर कुंभार यांनी मनोगत व्यक्त करताना पतसंस्थेच्या वाढत्या ठेवी, उलाढालीची माहिती सांगुन यापुढेही पतसंस्थेची मोठ्या प्रमाणात विकास होईल, याची खात्री सभासदांना दिली. वार्षिक सभेमध्ये ज्या सभासदांच्या पाल्यांनी अहवाल काळात इयत्ता – 10 व 12 वी परिक्षा व पदवी परीक्षेमध्ये विशेष प्रावीण्य मिळविले आहे. त्यांचा व त्यांच्या पालकांचा गुणगौरव करण्यात आला.
दरम्यान, सभेस संस्थेचे ज्येष्ठ संचालक बाळासाहेब काळभोर, ज्ञानेश्वर कुंभार, मुकुंद काळभोर, पांडुरंग काळभोर, जयेश हाडके, रमेश भोसले, अशोक भोसले, कृष्णा पवार, विठ्ठल लांडगे, शामराव शेवाळे, अनिल काळभोर, स्वाती हाडके, प्राजक्ता भोसले यांच्यासह कर्मचारी व सभासद उपस्थित होते. अहवाल वाचन व सुत्रसंचालन संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा तुपे यांनी केले.