राहुलकुमार अवचट
यवत : दौंड येथील मिरवणुकीत पॅलेस्टाइनचा झेंडा फडकावणाऱ्यावर कारवाई करण्याबाबत हिंदू राष्ट्र जनजागृती यांचे वतीने केडगाव पोलीस स्टेशन येथे निषेध आंदोलन करण्यात आले. पैगंबर जयंती निमित्त दौंड येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये काहींनी पॅलेस्टाइनचा झेंडा फडकावून देशविरोधी घोषणा दिल्या होत्या.
गणेश विर्सजन आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, त्यामुळे अशी कृत्ये करू नये. तसेच अन्य कोणत्याही समुदायाचा अपमान होणार नाही अशा सूचना देऊनही बुधवारी १८ सप्टेंबर रोजी महंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत काहींनी पॅलेस्टाइनचा राष्ट्रध्वज फडकावला.
हे राष्ट्रध्वज फडकविल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि पहिल्या बाजीराव पेशव्यांचे पुणे, हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे असे सांस्कृतिक शहर असलेल्या पुण्यात अशी घटना घडू नये, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते. याबाबत झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी केडगाव पोलिस चौकी समोर हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले.
यावेळी दौंड येथे झालेल्या घटनेमागे काही षडयंत्र आहे का? झेंडे फडकविणाऱ्यांना पकडून पुन्हा असे करण्याचे कुणाचे धाडस होणार नाही, अशी शिक्षा करणे, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करावी. तसेच असे राष्ट्रद्रोही कृत्या करणाऱ्या आरोपींवरोधात देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी राष्ट्रद्रोह करणाऱ्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी हिंदू राष्ट्र समन्वयक समितीचे अनेक पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त करत निषेध व्यक्त केला.