उरुळी कांचन, (पुणे) : शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी ‘आपला आमदार आपल्या गावी मुक्कामी’ असा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. मतदारांसोबत जनसंपर्क वाढावण्यासह मतदारसंघातील प्रश्न जाणून घेत सोडविण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार अशोक पवार यांनी दिली.
आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथे मुक्काम करून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत त्याची सोडवणूक करण्यासाठी अधिकाऱ्यांना कडक शब्दात सूचना केल्या. यावेळी ‘आमदार आपल्या गावात मुक्कामी’ आल्याचे पाहून ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. नागरिकांना आपल्या समस्यांसाठी सरकार दरबारी अनेक हेलपाटे मारावे लागतात. परंतु, आपणच त्यांच्या गावामध्ये जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घ्यावेत, या संकल्पनेतून आमदार अशोक पवार यांनी ‘आमदार आपल्या गावी मुक्कामी’ या संकल्पनेचे आयोजन केले आहे. यावेळी प्रशासनाच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आमदार पवार यांनी पूर्व हवेलीतील कुंजीरवाडी, तरडे, सोरतापवाडी, वळती परिसरातील नागरिकांशी संवाद साधून प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन सदरच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी अधिकाऱ्यांना ताकीद दिली. शेकडो स्थानिक नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. त्यातील काही समस्यांचा त्वरीत निपटारा करण्यात आला असून उर्वरित समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना आमदार पवार यांनी दिल्या.
या दौऱ्यात 42 ड अंतर्गत गावठाणाच्या पाचशे मिटर हद्दीतील क्षेत्राला एनए परवानगी, शेतकऱ्याच्या सातबारावरील पोटखराबा विहिताखाली आणण्याबाबत तसेच शिव रस्त्यांचा प्रश्न, लोणी काळभोर येथील अपर तहसील कार्यालयासाठी शासकीय जागेत इमारत मंजूर करण्याबाबत चर्चा करण्यात आली. आमदारांनी दिलेल्या सुचनांचे पालन करण्याचे आश्वासन तहसीलदारांनी यावेळी दिले.
सोरतापवाडी व कुंजीरवाडी गावच्या हद्दीतील खडकवासला जुना व नवीन कालव्यावरील मंजूर पुलाच्या कामाबाबत निवेदा प्रकिया लवकरात लवकर पुर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विनंती करण्यात आली. पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी गावच्या हद्दीतील आडवा पुल येथे रस्त्याला अंडरपास करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
बोरीऐंदी सब स्टेशनमधून दोन फिडर देण्यात येणार आहे. त्यामुळे वळती फिडरचा लोड विभागून त्यांचा फायदा वळती, शिंदवणे, तरडे, आळंदी म्हतोबाची या परिसराला होणार आहे. वळती तसेच रोमोशी वस्ती, आळंदी येथे अधिकच्या रोहित्राची मागणी असून त्याचे अंदाज पत्रक त्वरीत तयार करण्याच्या सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. कोळेकर वस्ती येथील नवीन रोहित्रावर भार टाकण्याची मागणी तरडे ग्रामस्थांची होती. ती मान्य करून लवकरात लवकर काम मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या.
दरम्यान, आमदार पवार यांनी महावितरण बरोबर नर्सरीधारकांची स्वतंत्र बैठक घेतली. यामध्ये धोकादायक ठिकाणचे ट्रान्सफॉर्मर बदलणे, काही ठिकाणी वीज मिळत नाही, त्या ठिकाणी पोहचवण्याच्या सूचना महावितरणला करण्यात आल्या. यावेळी उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे, हवेली भुमिअभिलेख अधीक्षक अमरसिंह पाटील, लोणी काळभोरच्या अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते, हवेलीचे गटविकास अधिकारी भूषण जोशी, विविध गावाचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.