मुंबई : बदलापूरमधील खासगी शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा (23 सप्टेंबर) पोलिसांसोबत अचानक झालेल्या चकमकीत एन्काऊंटर झाला आहे. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. अक्षय शिंदेच्या डोक्याला एक गोळी लागली आणि त्यानंतर अति रक्तस्त्राव झाला, असे त्याच्या शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. अक्षय शिंदेंच्या आई-वडिलांनी हायकोर्टात धाव घेत याप्रकरणी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर नुकतीच सुनावणी पार पडली.
मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणाची सुनावणी होत आहे. यावेळी सरकारी वकील हितेन वेणूगावकर यांनी कोर्टात सरकारची बाजू मांडली. याप्रकरणाचा तपास राज्य सीआयडीकडे दिला आहे. त्यांची स्वतंत्र चौकशी सुरू आहे. यावर कोर्टाने सीआयडीचा तपास कधी पूर्ण होणार याची माहिती द्या, असे निर्देश राज्य सरकारला देण्यात आले आहे.
तसेच यावेळी आरोपीच्या बाजूने वकील अमित कटारनवरे हे बाजू मांडत आहेत. आरोपीच्या वकिलाने अक्षयची हत्या करण्यात आल्याचा दावा केला आहे. अक्षय पोलिसांची पिस्तूल हिसकावून पळून जाऊ शकत नव्हता. त्याची तशी शारीरिक क्षमताही नव्हती. केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही हत्या करण्यात आली आहे, असा दावा आरोपीचे वकील अमित कटारनवरे यांनी केला आहे. हा फेक एन्काऊंटर असल्याने कोर्टाने त्यात लक्ष घालून चौकशी करावी. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष पथक दाखल करावे, अशी मागणीही आरोपीच्या वकिलाने केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाकडून प्रश्नांची सरबत्ती…
आरोपीच्या डोक्यात गोळी का मारली? पोलीस डोक्यात गोळी मारतात की पायावर? सामान्य माणूस बंदूक चालवू शकतो का? याला एन्काऊंटर म्हणू शकत नाही, एन्काऊंटरची व्याख्या वेगळी आहे? आरोपीला काबू करायला हवे होते, आरोपीला गोळी का मारली? तीन गोळ्या मारल्या, एक लागली तर दोन गोळ्या कुठे गेल्या? चार पोलीस एका आरोपीला काबू करु शकत नव्हते का? पिस्तूल की रिव्हॉल्व्हरमधून गोळी मारली? फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये गडबड असती तर पावले उचलावी लागतील? आरोपीने पिस्तूलचे लॉक ओपन करुन राऊंड फायर केले का? पोलीस अधिकारी जखमी झाले त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र मानवाधिकार आयोगाकडे सादर करा? घटनेशी संबंधित पोलीस अधिकारी कोर्टात आहेत का? असे प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने विचारले आहे.
म्हणून अंकुश शिंदेला मारलं…
बदलापूर प्रकरणात काही आरोपी आहेत. त्यांना पॉक्सो लावण्यात आला आहे. या आरोपींना वाचवण्यासाठीच अंकुश शिंदेला मारलं गेलं, असा आरोपही याचिकाकर्त्याच्या वकिलाने केला आहे. दरम्यान, कोर्टाने या एन्काऊंटर प्रकरणाचा फॉरेन्सिक रिपोर्ट मागितला आहे. गोळी कुठून चालली? किती लांबून गोळी मारली गेली याची माहिती देण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. तसेच कोर्टाने अनेक मुद्दयांवरून सरकारी वकिलांना धारेवरही धरले आहे.
दरम्यान, या याचिकेवर उच्च न्यायालय काय निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.