दीपक खिलारे
इंदापूर : शहरात तसेच तालुक्यात काही अल्पवयीन महाविद्यालयीन, शाळकरी मुले, मुलींना वाहन चालविण्याचा कोणताही परवाना नसताना देखील पालक आपल्या पाल्यांना सर्रास दुचाकी वाहने चालविण्यास देत असल्याचे चित्र आहे. अशा दुचाकीस्वारांवर बारामती शहराप्रमाणे इंदापूरात कारवाई कधी होणार असा सवाल सुज्ञ नागरीकांकडून विचारला जात आहे.
शहरात शाळा – महाविद्यालय परिसर, बाजारपेठ, इतरत्र ठिकाणी अल्पवयीन मुलांकडून सरार्स वाहन चालवितानाचे दृश्य नजरेस पडते. सदर अल्पवयीन दुचाकीस्वार हे सिंगल – डबल- ट्रिपल सीट बसून वाहन चालवताना आढळून येतात.
कधी-कधी विरुद्ध दिशेनेही वाहन चालवत असतात. यामुळे अपघातास निमंत्रण दिले जात आहे. याकडे पालकवर्गासह, वाहतुक शाखेचे दुर्लक्ष होत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून शेजारील बारामती शहरात पोलीस अधीक्षक अनंत भोईटे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या आदेशानुसार शहर वाहतुक शाखेतर्फे वाहन चालविणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या पालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
याप्रमाणे इंदापूर शहर वाहतुक शाखेतर्फेही शहरातही कारवाईचा बडगा उगारला जाणार का? शहरात अशा अल्पवयीन दुचाकीस्वारांना लगाम घातला जाणार का? की शहरातून अल्पवयीन दुचाकीस्वार असेच सुसाट सुटणार हे पाहणे औचित्याचे राहणार आहे.