-राहुलकुमार अवचट
यवत : दौंड तालुक्यातील राहू आणि वरवंड परिसरात दोन ठिकाणी एकाच बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रकार सोमवारी मध्यरात्री घडला आहे.
याबाबत यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहू गावाच्या हद्दीतील इंडिया या खासगी बँकेचे एटीएम सोमवारी मध्यरात्री फोडण्यासाठी एटीएम असलेल्या गाळ्याचे शटर तोडण्याचा प्रयत्न सुरु होता. त्यावेळी या ठिकाणी असणारे सुरक्षारक्षक दादा मोरे यांनी त्यांच्या कडील बंदुकी मधून हवेत गोळीबार केल्याने चोरटे पसार झाले. तर दुसरीकडे वरवंड गावात पुणे सोलापूर महामार्गावर असणाऱ्या गाळ्यात असणारे इंडिया कंपनीचे एटीएम सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
वरील दोन्हीही ठिकाणी कोणत्याही प्रकारची रक्कम चोरीला गेली नसून घटनास्थळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी भेट दिली. या प्रकरणी पोलीसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान यवत पोलिसांना एक टेम्पो आढळून आला आहे. तो एटीएम घेऊन जाण्यासाठी वापरण्यात येणार होता. संबंधित घटनेचा गुन्हा दाखल करण्याचे काम यवत पोलिसांकडून सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली आहे.