मुंबई: बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. सुरुवातीला अक्षयने एपीआय निलेश मोरे यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यामुळे पोलिसांनी स्वसंरक्षण करण्यासाठी त्याच्यावर उलट गोळीबार केल्याने या चकमकीत अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी अजूनही या वृत्ताला दुजोरा दिला नाही.
मात्र, या घटनेवर अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. माझ्या मुलाला मारून टाकण्यात आले आहे. अक्षयला साधा फटाका फोडता येत नाही, तो बंदूक काय चालवणार? असा प्रश्न त्याच्या आईने केला आहे. अक्षयच्या आईवडिलांनी या प्रकरणावरच संशय व्यक्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
अटकेत असलेल्या अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्याची माहिती मिळताच त्याच्या आईवडिलांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अक्षय शिंदेच्या आईने तर थेट पोलिसांवर आरोप केला आहे. माझ्या पोराची मी वाट बघतेय, माझं पोरगं असं करूच शकत नाही. गुन्हा दुसऱ्यानेच केला. मात्र तो दाखल माझ्या पोरावर केला.
जर माझ्या पोरानं असं काही केलं असतं, तर तो कामावर गेलाच नसता. माझा पोरगा खूप भोळा आहे. माझ्या पोराला गोळी घालून मारून टाकलं. आम्हाला देखील मारून टाका येतो. कोणत्या हॉस्पिटलला टाकलं तिथेच येतो, आम्हालाही मारा, असं अक्षयच्या आईने म्हटलं आहे.
फटाका फोडू शकत नाही
माझा पोरगा साधा फटका फोडू शकत नाही. तो बंदूक काय चालवेल? माझा पोरगा गाड्यांनासुद्धा घाबरायचा. आम्ही रोजचं काम करून जगणारे लोकं आहोत. आम्हीही आता जगणार नाही. आमच्या पोरासोबतच जाणार आहोत, असं अक्षय शिंदेची आई म्हणाली.