नाशिक : नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक जाचातून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यात धक्कादायक म्हणजे पतीने गळफास घेतल्यानंतर त्याच्या मृतदेहासमोरच बसून पत्नी पूजेचे साहित्य मांडून भक्ती करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेतली आहे. या घटनेने परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.
नवनाथ घायवट असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
या घटनेसंदर्भात अधिक माहिती पुढीलप्रमाणे, नाशिकरोड परिसरात कौंटुबिक वादातून नवनाथ घायवट यांनी आत्महत्या केली आहे. या प्रकरणी धक्कादायक प्रकार म्हणजे त्यांच्या पत्नीने पतीच्या मृतदेहासमोरच बसून पुजेचे साहित्य मांडले आहे. ज्यामुळे हा सगळा प्रकार पाहून पोलीसही हादरुन गेले आहे. हा सगळा प्रकार पाहता पत्नी मनोरुग्ण असल्याचा दावा नातेवाईक आणि पोलीसांनी केला आहे.
घटनेच्या दिवशी नवनाथ घायवट यांच्या घरी दुर्गाष्टमीची पूजा केली होती. या आयोजित पुजेच्या दिवशीच दोघांमध्ये वाद झाला त्यातून पत्नीच्या त्रासाला कंटाळून नवनाथने गळफास घेऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पतीने गळफास घेतला असतानाच त्यांच्या मृतदेहासमोरच पत्नी पूजा मांडून बसल्याचे निदर्शनास आले.
घायवट यांचे किराणा दुकान असून मुले शिक्षणासाठी पुण्यात आहेत. सुरवातीला ही आत्महत्या जादूटोण्याचा आणि अंधश्रद्धेतून झाल्याची परिसरात चर्चा होती. मात्र पोलीस तपासात पत्नी ही मनोरुग्ण असल्याचे समोर आले आहे. पत्नी वेडसर वागत असल्याने वारंवार घर सोडून जाते. या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. तर घायवट यांच्या पत्नीवर सुरू असलेल्या मानसिक वैद्यकीय उपचारांची कागदपत्रे पोलिसांनी हस्तगत केली आहेत. पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.