पुणे : मागील आठवड्यापासून राज्यभरात पावसाने विश्रांती घेतली आहे. परंतु, आज शनिवारपासून पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. भारतीय हवामान खात्याने आजपासून राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईसह उपनगरातही पावसाच्या सरी..
मुंबईसह उपनगरातही पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या 24 तासांत मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात चांगला पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने देशातील वातावरण अनेक मोठे बदल होत आहे. काही भागात उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. पश्चिम बंगाल, ओडिशा राज्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे. तर झारखंड आणि बिहारला देखील पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील तापमानाचा पारा वाढला असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रात पुन्हा पावसाची बरसात..
परतीचा प्रवास सुरु होण्याआधी महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होत असून येत्या 24 तासांत मराठवाडा, खान्देशमध्ये हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, पुणे नवी मुंबई आणि रायगड पट्ट्यात हलका ते मध्यम पाऊस होईल, असं आयएमडीकडून सांगण्यात आलं आहे.
या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट आयएमडीने पुढील २४ तासांसाठी जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भ, मराठवाडा, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे.