लोणी काळभोर : दौंड शहराला पुण्याचे उपनगर म्हणून मान्यता देऊन पुणे-लोणावळा प्रमाणे पुणे-दौंड लोकल सुरु करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच सकाळी ६ ची दौंड पुणे डेमू गाडी हडपसर मध्ये थांबवण्या ऐवजी पुणे रेल्वे स्टेशन पर्यंत नेण्याची मागणी रेल्वे प्रवाशांनी केली आहे.
पुणे दौंड लोहमार्गाचे २०१६ मध्ये म्हणजे आठ वर्षांपूर्वी विद्युतीकरण पूर्ण होऊनही, स्थानिक सुविधा आणि सेवांमध्ये अद्यापही लक्षणीय सुधारणा झालेली नाही. या सुधारणा तत्काळ करण्याची मागणी करण्यात येत आहे. अनेक वर्षांपासून पुणे दौंड मार्गावरील प्रवाशांची मागणी आहे की पुणे लोणावळा मार्गावर ज्या कार्यक्षमतेने रेल्वे प्रशासन सेवा देते तशाच सेवा पुणे दौंड मार्गावरही सुरु कराव्यात, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.
पुणे ते दौंड दरम्यानचा रेल्वे मार्ग १३० किलोमीटर प्रती तास या वेगाने रेल्वे गाड्या चालतील या पद्धतीने विकसित करण्यात आला आहे. तरीही डेमू गाड्या सततच्या तांत्रिक अडचणींमुळे फक्त ७० किलोमीटर प्रती तास वेगाने चालत आहेत. त्यामुळे ७४ किमी अंतर कापण्यासाठी सुमारे दोन तास लागतात. प्रशासनाकडून लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य दिल्याने हा विलंब वाढतो, त्यामुळे स्थानिक प्रवाशांकडे व स्थानिक रेल्वे सेवेकडे दुर्लक्ष होते आहे. गेल्या आठ वर्षांत, राज्याबाहेरील प्रवासासाठी अनेक नवीन एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र कोविड १९ ( करोना महामारी) साथीच्या दरम्यान स्थगित करण्यात आलेल्या लोकल गाड्या अद्याप पुन्हा सुरू करण्यात आलेल्या नाहीत.
दौंडहून सकाळी ६ वाजता पुण्याकडे जाणारी डेमू ट्रेन सध्या पुण्यापासून अलिकडे पाच किलोमीटर अंतरावर हडपसर येथे थांबते. यामुळे अनेक कामगार, विद्यार्थी आणि इतर प्रवाशांना हडपसर येथे उतरण्यास भाग पाडले जाते, परिणामी कामावर, शाळा- महाविद्यालयात जायला विलंब होतो आणि प्रवास खर्च वाढतो. साधारणत: फक्त ८- १० डब्यांचा समावेश असलेल्या या ट्रेनमध्ये महिला, प्रथम श्रेणी, अपंग आणि गरोदर प्रवाशांसाठी डब्यांचा अभाव आहे, त्यामुळे गाडीत प्रचंड गर्दी असते. केंद्रीय रेल्वेमंत्री, रेल्वे राज्यमंत्री आणि खासदार यांच्याकडे अनेक वेळा निवेदने देऊनही, प्रवाशांना केवळ आश्वासने मिळतात पण त्यात कोणतीही भरीव सुधारणा झालेली नाही.
पुणे शहराचे उपनगर म्हणून वेगाने विकसित होणा-या लोणी काळभोर व उरुळी कांचन परिसराच्या विकासासाठी पुणे दौंड लोकल सेवा तातडीने सुरू करण्याची गरज आहे. पुणे दौंड लोहमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पुणे दौंड लोकल सुरू करावी अशी मागणी होत आहे. या लोकलमुळे दौंड, पाटस, केडगांव, यवत, उरुळी कांचन, लोणी काळभोर, मुंढवा आणि हडपसर परिसरातील रेल्वे प्रवाशांना आता थेट लोकलने लोणावळ्या पर्यंतचा प्रवास करता येणार आहे.
प्रवाशांच्या नेमक्या मागण्या कोणत्या?
१) लोकल ट्रेनच्या सुधारणांना प्राधान्य द्या.
२) सेवा सुरळीत करण्यासाठी दौंड हे पुण्याचे उपनगर म्हणून घोषित करा.
३) सकाळी ६ ची डेमु गाडी हडपसर ऐवजी पुणे स्टेशनवर न्या
४) कोविड- १९ महामारी दरम्यान बंद केलेल्या गाड्या पुन्हा सुरू करा.
५) दौंड ते पुणे सकाळी ८ ते संध्याकाळी ५ दरम्यान दोन नवीन गाड्या सुरू करा.