चाकण, (पुणे) : पुण्यातील चाकण परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वारंवार अपमानास्पद वागणूक देत शिवीगाळी आणि मारहाण होत असल्याने भाच्याने त्याच्या मामाचा मित्राच्या मदतीने दारू पाजून, लाकडी दांडक्याने मारहाण करून व गळा दाबून निघृण खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना रासे (ता. खेड) येथे गुरुवारी (दि. १९) उघडकीस आली आहे. याप्रकरणी भाच्यासह दोन जणांना चाकण पोलिस व युनिट ३ गुन्हे शाखा, पिंपरी- चिंचवडच्या पथकाने अटक केली आहे.
संदीप ऊर्फ बाळशीराम शिवाजी खंडे (वय-४०, रा. ठाकरवाडी, रासे, ता. खेड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सुरेश ज्ञानेश्वर मेंगाळ (वय ३७, रा. ठाकरवस्ती, रासे, ता. खेड जि. पुणे) व दिलीप ऊर्फ टपाल पांडुरंग अघान (पत्ता समजू शकला नाही) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रासे गावच्या हद्दीतील मुंगसेवस्ती येथील ओढ्याजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृताचा चेहरा छिन्नविच्छिन्न अवस्थेत होता. याप्रकरणी पोलिसांनी मृताची ओळख पटवली. हा मृतदेह संदीप खंडे यांचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी तांत्रिक व खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांना संशयित सुरेश मेंगाळ याने संदीप खंडेचा खून केल्याची समजले. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ मेंगाळ यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली.
संदीप शिवाजी खंडे हा मेंगाळचा नात्याने मामा होता. खंडे हा वारंवार मेंगाळला लोकांसमोर अपमानास्पद वागणूक देत शिवीगाळ व मारहाण करत होता. त्यामुळे मेंगाळने खंडेला दारू पाजून मुंगसेवस्ती येथील ओढ्याजवळ निर्जनस्थळी नेले. तेथे पुन्हा दारू पाजून मित्र दिलीप अधानच्या मदतीने खंडेचा खून केला. दिलीपने दांडक्याने खंडेच्या तोंडावर जबर मारहाण केली.
त्यानंतर मेंगाळने गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह झुडपात फेकून दिला. दरम्यान, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश गायकवाड व पथकाने दुसरा आरोपी दिलीप अघानला ताब्यात घेतले. चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद वाघ, सहायक पोलिस निरीक्षक प्रसन्न जराड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.