देहूरोड : देहूरोड येथून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बहिणी सोबत प्रेम संबंध असल्याच्या कारणावरून तिघांनी मिळून एका तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 20) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास जेसुस चर्चच्या पाठीमागे घडली आहे. अजय जोगिंदर लुक्कड (वय-21) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी कुणाल चंदू सकट (वय-18), प्रेम सचिन मोरे (वय-19), तसेच ओमकार उर्फ गणेश रवींद्र पवार या तिघांजणांना देहूरोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत देहूरोड – कात्रज बायपास रोडवर असलेल्या ट्राय जेसुस चर्चच्या पाठीमागे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका खदानीमध्ये शुक्रवारी सकाळी एका तरूणाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार देहूरोड पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली असता अजय लुक्कड हा मृतावस्थेत असल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, काही कासच्या आतच पोलिसांनी तीन जणांना संशयावरून ताब्यात घेतले आहे. अजय लुक्कड याचे आरोपी कुणाल सकट याच्या बहिणीसोबत प्रेम संबंध होते. त्या कारणावरून कुणाल याने त्याच्या दोन साथीदारांसोबत मिळून अजय याला देहूरोड पोलीस ठाण्याजवळील खदानी जवळ बोलावून घेत खदानीत ढकलून दिले. या घटनेत अजयचा मृत्यू झाला. पुढील तपास देहूरोड पोलीस करत आहेत.