पुणे: राज्यातील खरिपाच्या पिकांची नोंदणी अंतिम टण्यात असताना ई-पीक पाहणी अॅपमध्ये मोठ्या प्रमाणात तांत्रिक बिघाड येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असून, पिकांची नोंदणी वेळेत झाली नाही, तर पीक विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच क्षेत्रनिहाय किती पिकाची लागवड झाली, याची स्पष्टोक्ती होणार नसल्याने राज्य शासनाने ई-पीक पाहणीच्या नोंदणीसाठी २३ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
खरीप हंगाम २०२४-२५ वर्षातील ई-पीक पाहणी नोंदणी करण्यासाठी महसूल विभागाकडून १ ऑगस्टपासून सुरुवात करण्यात आली आहे. अनेक अडथळे पार करून शेतकऱ्यांनी मोबाइलवरील ई-पीक पाहणी अॅपच्या माध्यमातून शेतातूनच पिकांची नोंदणी करावयाची आहे. मात्र, या इंटरनेट सुविधेमध्ये येणारे अडथळे, सर्व्हरमधील तांत्रिक बिघाड यामुळे सर्व ठिकाणी शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पुणे जिल्ह्यात खरीप हंगामातील ६८ टक्के नोंदणी पूर्ण झाली असून, उर्वरित ३२ टक्के नोंदणी रखडली आहे.
याबाबत तांत्रिक पातळीवर दुरुस्ती करण्यात आली असतानाही अद्याप परिस्थिती जैसे थेच असून, नोंदणी करताना अडथळे येत असल्याच्या जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे शासनाने २३ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असून, तलाठी स्तरावरील ई-पीक पाहणीच्या तपासणीचा कालावधी देखील वाढवून दिला असून, २४ सप्टेंबर ते २३ ऑक्टोंबरपर्यंत तलाठी प्रत्यक्ष पाहणी करण्याबाबत निर्देश दिले आहेत.