पुणे : राज्यात महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. बदलापूरमधील शाळेतील मुलींवर झालेला अत्याचार असो की राज्यभरातील वेगवेगळ्या शहरातील घटना असो, मुली-महिला अत्याराला बळी पडतानाच दिसत आहेत. नराधम गुन्हेगारांना कायद्याचा काही धाकच उरलेला नाही. अशातच आता भोर येथील एका गावात अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरडीवर एका अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पुणे-सातारा महामार्गावरील एका गावात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी आरोपीच्या घराशेजारी राहते. त्यांची आधीपासूनच एकमेकांशी ओळख होती. अल्पवयीन मुलीकडे आरोपी खेळण्यास येत होता. लहान मुलीची आई कपडे धूत असताना अल्पवयीन आरोपीने चिमुरडीला त्याच्या खोलीत नेऊन आतून कडी लावून घेतली. त्यानंतर मुलीच्या रडण्याचा आवाजाने मुलीची आई बंद असलेल्या खोलीकडे धावत गेली. तिने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु, आरोपीने दरवाजा उघडला नाही. आरडाओरडा केल्यानंतर अल्पवयीन आरोपीने मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेची माहिती राजगड पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र आरोपीने पलायन केल्यामुळे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वेगवान गतीने तपासाची चक्रे फिरवून अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणात अल्पवयीन मुलाने त्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले असून, या घटनेची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे.