उरुळी कांचन, (पुणे) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोबर हा दिवस ‘स्वच्छ भारत दिवस’ म्हणून साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा प्रारंभ उरुळी कांचन ग्रामपंचायत समोर बुधवारी (ता. 18) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे हे स्वतः उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती उरुळी कांचन ग्रामपंचायतीचे सरपंच अमित (बाबा) कांचन व माजी सरपंच संतोष कांचन यांनी दिली.
या मोहिमेत ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ ही थीम निश्चित केली असून उरुळी कांचन व परिसरातील नागरिकांनी या स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच या पंधरवडा कालावधीमध्ये विविध उपक्रम राबविण्याबाबत राज्य व केंद्राच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात विविध दैनंदिन उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
सफाई मित्र, सुरक्षा शिबिर या उपक्रमाद्वारे सफाई मित्रासाठी एक खिडकी योजनेद्वारे सर्व योजनांच्या अनुषंगाने पात्र लाभार्थ्यांसाठी मोहीम राबविण्यात येणार आहे. गुरुवारी (ता. 19) एक दिवस श्रमदानासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाण, कार्यालय, संस्थात्मक इमारती, व्यावसायिक व बाजारपेठ, सार्वजनिक वाहतूक केंद्रे, प्रमुख रस्ते व महामार्ग, पर्यटनस्थळ, रेल्वे स्थानके, धार्मिक, अध्यात्मिक स्थळे, प्राणी संग्रहालय, राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये, ऐतिहासिक वास्तू, वारसास्थळे, नदी किनारे, घाट, नाले या ठिकाणांची साफसफाई ग्रामस्थ, एनएसएस व एनसीसी, विविध मंडळे, सामाजिक संस्था व विद्यार्थ्यांमार्फत केली जाणार आहे.
शुक्रवारी (ता. 20) गावातील खाऊ गल्ली किंवा बाजार पटांगणामध्ये स्वच्छतेच्या अनुषंगाने मोहीम राबविणे, स्वयंस्फूर्तीने लोकसहभागाच्या माध्यमातून शास्त्रयुक्तपद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. शनिवारी (ता. 21) जिल्ह्याच्या संस्कृतीनुसार सांस्कृतिक कार्यक्रमात पथनाट्ये व कलापथकांचे स्वच्छतेच्या अनुषंगाने जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी गर्दीच्या ठिकाणांची निवड करण्यात येणार आहे.
रविवारी (ता. 22) प्लास्टिक जनजागृतीसाठी एकल प्लास्टिक न वापरण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. सोमवारी (ता. 23) सर्व कुटुंबांना गृहभेटीद्वारे जनजागृती करून ‘एक झाड आईच्या नावे’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. मंगळवारी (ता. 24) तालुकास्तरावर खासदार व आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी, सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत स्वच्छता ज्योत, स्वच्छता दौड, स्वच्छता सायकल स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. बुधवारी (ता. 25) गावामध्ये टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याबाबत स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
गुरुवारी (ता. 26) गावातील सार्वजनिक शौचालयाची साफसफाई व दुरुस्ती करण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता. 27) कायम अस्वच्छ व दुर्लक्षित ठिकाणांची सफाई करण्यात येणार आहेत. शनिवारी (ता. 28) वैयक्तिक स्तरावर कंपोस्ट खत, शोष खड्डा निर्मिती करण्यात येणार आहे. रविवारी (ता. 29) स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत निर्मिती केलेल्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. सोमवारी (ता. 30) स्वच्छता वाहने व उपकरणांची स्वच्छता व सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
मंगळवारी (ता. 01) ऑक्टोबरला स्वच्छता प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे. बुधवारी (ता. 02) ऑक्टोबरला ग्रामसभा घेऊन ‘स्वच्छ माझे अंगण’स्पर्धेतील सर्वोत्तम कुटुंबास प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे. या दिवशी स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या अभियान कार्यक्रमांत जिल्हावासीयांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.