ओमकार भोरडे
तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील शिवतक्रार म्हाळुंगी येथे 15 सप्टेंबरच्या रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास युवराज साळुंके (रा. शिवतक्रार म्हाळुंगी) हे त्यांच्या कुटुंबासह घरी जात होते. त्यावेळी त्यांना त्यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर बिबट्या निदर्शनास आला.
शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी, पारोडी, विठ्ठलवाडी, न्हावरे, टाकळी भिमा, सातकरवाडी, इंगळेनगर, दहिवडी या गावांमध्ये बिबट्याचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे सतत लोकवस्तीत दर्शन होत आहे. परिसरात कुत्री वासरे व शेळ्यांवर केलेल्या हल्ल्यांच्या अनेक घटना घडल्या आहेत.
शिवतक्रार म्हाळुंगी येथे सर्रास बिबट्याचं दर्शन होत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. वनविभागाने या गोष्टीकडे तात्काळ लक्ष देऊन बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजऱ्याची व्यवस्था करण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.