पुणे : नवले पुलावरील अपघात हा ब्रेक फेलमुळे नाही तर चालकाच्या चुकीने झाला असल्याचे आरटीओच्या तपासात स्पष्ट झाले आहे. तीव्र उतारावर चालकाने इंजिन बंद करून न्यूट्रलवर गाडी चालविल्याने गाडीचे ब्रेक लागू शकले नाहीत, असा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.
अपघातांसाठी बदनाम असलेल्या नवले पुलावर काल रात्री पुन्हा एकदा मोठा अपघात झाला. या अपघातात ट्रकचालकाने तब्बल ४८ वाहनांना धडक दिली . धडक दिलेल्या अनेक गाड्यांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. यातील जमखी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काल अपघात झाल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) अधिकाऱ्यांनी अपघात घडवून आलेल्या ट्रकची तपासणी केली. या तपासणी दरम्यान त्यांना चालकाने इंजिन बंद केल्याचे आढळून आले.
मोठ्या गाड्यांमध्ये इंजिन सुरु असेल तरच ब्रेकसहीत सगळ्या सुविधा कार्यरत असतात. मात्र, कालच्या वाहनचालकाने गाडीचं बंद केल्याने ब्रेक संबंधित कार्यप्रणाली देखील सुरु राहिली नाही, आणि हा अपघात घडून आला.
कात्रज बोगदा सोडल्यानंतर जांभुळवाडी तलाव, सूर्यनारायण मंदिर, नऱ्हे गावापर्यंत तीव्र स्वरूपाचा उतार आहे. या भागात अनेक गाड्या इंधनाची बचत करण्यासाठी गाडी न्यूट्रल अथवा बंद करतात.
किमान ६ ते ७ किमीचा हा पट्टा असल्याने मोठ्या गाड्यांची एक ते दोन लिटर इंधनाची बचत होते. यामुळे अनेकदा छोट्या मोठ्या गाड्याचे चालक असे प्रयोग करतात. यामुळे असे चालक स्वतःच्या जिवाबरोबर इतर लोकांच्या जीवांसोबत देखील खेळतात.