दीपक खिलारे
इंदापूर : शहाजीनगर (ता. इंदापूर ) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने चालु सन २०२२-२३ च्या २२ व्या गळीत हंगामामध्ये कारखान्याच्या प्रतिदिनी गाळपाच्या इतिहासामध्ये प्रथमच शनिवारी (ता .१९) उच्चांकी ६००० मेट्रिक टन उसाचे गाळप करून कौतुकास्पद कामगिरी केली आहे. चालु गळीत हंगामामध्ये कारखान्याची ८ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने कारखान्याची दमदार वाटचाल सुरु आहे.
सध्या कारखान्याचा चालु गळीत हंगाम उत्कृष्टपणे चालू असून, कारखान्याने शनिवारी दि.१९ अखेर १,३४,२६३ मे. टन ऊसाचे गाळप पूर्ण केले आहे. सध्या प्रतिदिनी सुमारे ५३०० ते ५६०० मे. टन क्षमतेने ऊस गाळप सुरु आहे. तसेच कारखान्याचे सहवीज निर्मिती, इथेनॉल आदी उपपदार्थ निर्मिती करणारे प्रकल्प पूर्ण कार्यक्षमतेने चालू आहेत.
कारखान्याने एका दिवसामध्ये उच्चांकी ६००० मे.टन उसाचे गाळप केलेबद्दल कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, कार्यकारी संचालक राम पाटील व संचालक मंडळ यांनी कारखान्यास ऊस पुरवठा करणारे शेतकरी, तोडणी वाहतूक कंत्राटदार व मजूर, अधिकारी, कर्मचारी व कारखान्याचे हितचिंतक यांचे अभिनंदन केले आहे.