सासवड : सासवड शहरात पन्नासहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे उत्सव साजरा करत असतात. बहुतांश गणेश मंडळांनी विद्युत रोषणाई व आकर्षक सजावट करून विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मात्र, यंदाच्या वर्षी बहुतांश गणेश मंडळांनी देखाव्यांकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे.
सासवड एस टी स्टँड जवळ असलेले स्वराज मंडळ यंदा उत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत असून मंडळाने संगीताच्या तालावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे, अशी माहिती अध्यक्ष संदेश गायकवाड व कार्याध्यक्ष संतोष खोपडे यांनी दिली. सोपान नगर येथील अखिल सोपान नगर मंडळाने साध्या पद्धतीने सजावट केली असुन त्यांनी शंभरहून अधिक शालेय विद्यार्थ्यांचे अथर्वशीर्ष पठण आयोजित केले होते. सर्व सहभागी विद्यार्थ्यांस वह्या पेन आदी साहित्य वाटप केल्याचे मंडळ अध्यक्ष सर्वेश सावंत यांनी सांगितले.
सोपान नगर येथील साई साम्राज्य चौकातील ओम साई मित्र मंडळ आपले २९ वे वर्ष साजरे करत असून मोफत आरोग्य तपासणी शिबिर, किर्तन, लहान मुलांच्या क्रीडा स्पर्धा, महिलांसाठी मानाची पैठणी स्पर्धा आदी कार्यक्रम आयोजित केल्याचे आनंद जगताप, अथर्व पोमण यांनी सांगितले. गावातील चांदणी मंडळ अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असून त्यांनीही जादूचे प्रयोग, स्थानिक कलाकारांचा गाण्यांचा कार्यक्रम, ज्येष्ठांचे सत्कार, भारूड आदी भरगच्च कार्यक्रम आयोजित केल्याचे अध्यक्ष प्रशांत न्हालवे, विरेश दहीवले यांनी सांगितले.
विविध सामाजिक उपक्रमात वर्षभर कार्यरत असणाऱ्या व २१ किलो चांदीचे दागिने असलेल्या अजय मंडळ यावर्षी जीवनवर्धीनी विद्यालयातील अती विशिष्ठ मुलांना पुण्याच्या सहलीचे आयोजन करत त्यांना गणेशोत्सव दाखवण्याचा उपक्रम राबविला आहे, असे प्रविण पवार यांनी सांगितले. जगताप आळीतील छत्रपती मंडळाने आकर्षक सजावट करून रस्त्यावर विद्युत रोषणाईसह स्वागत कमान उभारली आहे, असे अध्यक्ष संकेत जगताप यांनी सांगितले.
नेताजी चौकातील श्रीमंत नेताजी मंडळाने आकर्षक सजावट केली असुन मंडळाच्या स्वतःच्या मालकीच्या जागेत श्रींची प्रतिष्ठापना केली आहे. धान्य बाजारातील दत्त मंडळ ट्रस्टने दहा तोळे सोन्याचे दागिन्यांचा संकल्प सोडला असून त्यांची विसर्जन मिरवणूक भव्य स्वरूपाची असल्याचे अध्यक्ष विनोद ओव्हाळ यांनी सांगितले. शहराच्या वाढीव हद्दीतील अखिल तारादत्त मंडळ ३० वे वर्ष साजरे करत असून विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याचे अध्यक्ष ओंकार पवार यांनी सांगितले.
जेजुरी नाक्यावरील शिवशंभो मंडळ साध्या पद्धतीने परंतू उत्साहाने सोहळा साजरा करत असल्याचे अध्यक्ष सिद्धेश कसबे याने सांगितले. बाजार पेठेतील अमर मंडळ ७७ वे वर्ष साजरे करत असून पालखीतून विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे संग्राम चव्हाण यांनी सांगितले. लांडगे आळीतील महात्मा फुले मंडळाने श्रींची फुलांनी सजावट केली आहे. साळी आळी येथील कृष्णराज मंडळाने अष्टविनायक दर्शन देखावा केल्याचे दिपक टकले यांनी सांगितले. ब्राम्हण आळीतील आचार्य अत्रे मंडळाने सुंदर सजावट केली असल्याची माहिती अध्यक्ष संतोष पवार यांनी दिली.
पी एम टी स्टँड जवळील श्रीनाथ मंडळ, भूमी अभिलेख कार्यालया नजिकचे शिव साम्राज्य मंडळ, कुंभार गल्लीतील संत गोरा कुंभार मंडळ, सोपान नगर येथील वीर सावरकर मंडळ, ब्राह्मण आळीतील कऱ्हाबाई मंडळ, साठे नगर येथील एकता मंडळ, हडको रोडवरील जयहिंद मंडळ यांसह अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे साध्या परंतु उत्साहाच्या वातावरणात हा सोहळा साजरा करत असल्याचे चित्र आहे.