पुणे : मागील काही दिवसांपासून वातावरणात मोठे बदल होत असलेलं दिसून येत आहेत. कधी रिमझिम पाऊस तर कधी उन्हाच्या झळा अनुभवायला मिळत आहार. त्यातच आता बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता आणखीच वाढत आहे. परिणामी पूर्व भारतात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. याचा काहीसा परिणाम महाराष्ट्रावरही होणार असून आज रविवारी (ता. १५) काही भागात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबईसह उपनगरात पावसाच्या हलक्या सरी..
आयएमडीने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज मुंबईसह उपनगरात पावसाच्या हलक्या सरी बसरण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे विदर्भासह मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे तर उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.
सप्टेंबर महिना सुरु होताच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहिले आणि पाणीपुरवठा करणारे तलाव तसेच धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा जमा झाला आहे. मराठवाड्याला पाणीपुरवठा करणारे जायकवाडी धरण १०० टक्के भरले असल्यामुळे धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने आराम घेतला आहे. त्यामुळे उन्हाचा कडाका देखील जाणवू लागला आहे. शनिवारी २४ तासांमध्ये चंद्रपुर येथे राज्यातील उच्चांकी ३३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. इतर जिल्ह्यातही तापमानाचा पारा वाढताच असून त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. अशातच आता भारतीय हवामान खात्याने आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तविली आहे.. उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातही पावसाचा अंदाज आहे.