अहमदपूर : शेती विक्रीतून आलेले पैसे मुलीच्या नावावर बँकेत टाकायचे की अहमदपूरात प्रॉपर्टी घ्यायची या कारणावरून, तसेच मयत हा एका व्यक्तीस घरी येण्यास विरोध करत असल्याचा राग मनात धरून पत्नीने अन्य एकाच्या मदतीने पतीचा खून करून त्याचा मृतदेह पोत्यात बांधून गोदावरीत नदीत फेकला. याबाबत मृताचा भाऊ नागनाथ गुरुनाथ नागवंशी (रा. गांधी चौक बसवकल्याण जि. बिदर, कर्नाटक) यांनी अहमदपूर पोलिसांत तक्रार दिली होती. त्याआधारे पोलीसांनी मंगळवारी (दि.१०) रात्री मृताची पत्नी व अन्य एकावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी अहमदपूर पोलिसात नागनाथ नागवंशी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचा भाऊ मोहन गुरुनाथ नागवंशी (मयत) यांचे २५ वर्षांपूर्वी अहमदपूर येथील स्वाती माणिकराव धडे (५४) हिच्याशी लग्न झाले होते. त्यांना दोन मुली झाल्यानंतर आमच्याच गावातील बसवकल्याण येथील आनंद धनुरे आणि आमच्या भावाची मैत्री झाली होती. त्यामुळे तो आमच्या घरी सतत ये-जा करत असे. त्यानंतर आनंद धनुरे व स्वाती नागवंशी (भावजय) यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाल्याचे परिवारातील सदस्यांना समजले असता स्वाती नागवंशी ही भावाला घेऊन अहमदपूरमध्येच भाड्याने रूम घेऊन राहत होती. आनंद धनुरे हा अधूनमधून अहमदपूर येथील भावाच्या घरी जात असे. तो भावाच्या आर्थिक व्यवहारात ढवळाढवळ करायचा, असे मोहनने (५८) गावाकडे आल्यावर आम्हास सांगितले. सतत घरी येणे, व्यवहारात ढवळाढवळ करणे मोहनला पटत नव्हते.
परंतु, त्यास स्वातीचा पाठिंबा होता. त्या दोघांनी माझ्या भावास बसवकल्याणची जमीन विकून अहमदपूरला प्रॉपर्टी घ्यायची आहे, असा तगादा लावला. जमिनीचे पैसे माझा भाऊ मोहन हा मुलींच्या नावावर टाकायचे म्हणत होता. परंतु, स्वातीला त्या पैशातून शहरात प्रॉपर्टी घ्यायची होती. या कारणासह आनंद धनुरे घरी येण्यास भावाचा विरोध असल्यामुळेच स्वाती नागवंशी आणि आनंद धनुरे यांनी मोहन यांचा ६ सप्टेंबर रोजी रात्री ११ : ३० च्या सुमारास राहत्या घरी खून केला. त्याचा मृतदेह पोत्यात बांधून दुचाकीवरुन अहमदपूर येथून नांदेड येथे घेऊन जात गोदावरी नदीवरील वाजेगाव भागातील जुन्या पुलावरून नदीच्या पात्रात फेकून देऊन पुरावा नष्ट केला.