मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्यासाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाकडून लाडकी बहीण योजनेची जाहिरात करताना मुख्यमंत्री हा शब्द वगळला होता. या पार्श्वभूमीवर आता शिंदे यांनी ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी साकारण्यात आलेल्या देखाव्यातून अजित पवार यांचा फोटो गायब करत जोरदार प्रत्युत्तर दिले.
गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थात देखाव्याच्या माध्यमातून राज्य सरकारच्या विविध योजनांचे फोटो लावले आहेत. महायुती सरकारच्या काळातील विविध योजनांची माहिती ही या देखाव्यातून दिली आहे. शिवाय राज्यातील त्या-त्या भागातील आमदारांचे फोटो लावले आहेत. तसेच ड्रीम प्रोजेक्टची देखील माहिती देखाव्यात साकारण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि महाराष्ट्रांच्या नकाशातून देखील अजित पवार गायब आहेत. विशेष महणजे पवारांच्या जागी शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटो लावला आहे. पवार यांचा वैद्यकीय सहाय्यता कक्ष या पोस्टरवर केवळ एकच फोटो लावला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजनेचे श्रेय घेण्यासाठी महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. राखी पौर्णिमेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींचा देवाभाऊ या उपक्रमाअंतर्गत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींशी संवाद साधला होता. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाकडून लाडकी बहीण योजनेची जाहिरात करण्यात आली. या जाहिरातीतून मुख्यमंत्री हा शब्द वगळण्यात आला होता. त्यामुळे पवार हे एकटेच या योजनेचे श्रेय घेत असल्याचा दावा महायुतीच्या इतर नेत्यांकडून करण्यात आला. आता यावरून मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी झाल्याची चर्चा आहे. यानंतर शिंदे यांनी लाडकी बहीण योजना कुटुंब भेट असा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ मंगळवारपासून झाला आहे. मात्र, त्याआधीच शिंदे यांनी देखाव्यातून अजित पवारांना गायब करून डिवचले आहे. महायुतीला लक्ष्य करण्यासाठी महाविकास आघाडीच्या हातात यामुळे आयतेच कोलीत मिळाले आहे.