आळंदी – सीआरपीएफचा जवान असणाऱ्या पारनेर तालुक्यातील ढवळपुरी गावाच्या गोरक्षनाथ बाळासाहेब चौधरी व सविता गोरक्षनाथ चौधरी या दाम्पत्याला तीर्थक्षेत्र आळंदी येथील कार्तिक वद्य एकादशीच्या दिवशी महापूजेचा मान मिळाला.
एकादशीच्या दिवशी रात्री १२ ते पहाटे २ यावेळात ११ ब्रह्मवृदांच्या वेदघोषात माऊलींची महापूजा करण्यात येते. दर्शनबारीत जे दाम्पत्य सर्वात पुढे असे त्यांना हा पूजेचा मान मिळतो.
मागील वर्षी जालना जिल्ह्यातील शेतकरी दाम्पत्याला हा मान मिळाला होता. दर्शनासाठी उपस्थित असणाऱ्या लाखो भाविकांमधून ही निवड होत असल्याने हा मान मिळणे भाग्याचे समजले जाते. या महापूजेच्या वेळी मंदिर समितीचे विश्वस्त, प्रशासकीय अधिकारी, ग्रामस्थ, निमंत्रित सदस्य उपस्थित असतात.
दरम्यान, आज (रविवार दि. २०) कार्तिकी एकादशी आहे तर मंगळवार (दि. २२) माऊलींचा ७२६ वा संजीवन समाधी सोहळा आहे. यावेळी तीन लाखापेक्षा अधिक भाविक या सोहळ्यासाठी आळंदीत दाखल झाले आहेत.
“मी सध्या छत्तीसगड येथे कार्यरत असून सुटीसाठी गावी आलो होतो. दोन वर्षांपूर्वी आमचे लग्न झाले असून आज माऊलींच्या दर्शनासाठी आलो असता आम्हाला महापूजेचा आणि पहिल्या दर्शनाचा मान मिळाला.
माझे वडील वारकरी असून आई वडिलांच्या पुण्याईने दर्शनाची संधी मिळाली. सर्वांना सुखात ठेव असेच मागणे माऊलींकडे मागितले आहे.”
अशी भावना जवान गोरक्षनाथ चौधरी यांनी व्यक्त केली.