मुंबई : राज्यात सद्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अशातच आता अजित पवार यांच्याबाबत एक बातमी समोर आली आहे. बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक आमदार असूनही कमी जागा असणाऱ्या संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदाची संधी भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाने दिली आहे. तशीच संधी मलाही महाराष्ट्रात द्यावी, अशी इच्छा राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे व्यक्त केल्याची मिळत आहे. ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकाने असे वृत्त दिले आहे.
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाचा मुहूर्त साधून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आले होते. राज्य भाजपच्या कोअर कमिटीमधील वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांनी रविवारी रात्री निवडणुकीची तयारी आणि जागा वाटपासंबंधी चर्चा केली असल्याची माहिती मिळत आहे. महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाताना घ्यावयाची काळजी आणि निवडणूक रणनीतीसंबंधी अनेक सूचना करून ते दिल्लीला परतले. तसेच राजधानी दिल्लीला परत फिरताना मुंबई विमानतळावर शाह यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेतली.
मैत्रीपूर्ण लढतीवर चर्चा?
जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी अमित शाह यांनी भेट घेतली. भाजप आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच असलेल्या जवळपास २५ ते ३० विधानसभा मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढती करण्यात याव्या, यावर चर्चा झाली. तसा प्रस्ताव भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश समितीने अमित शाह यांना दिलेला होता. निवडणुकीच्या तोंडावर संभाव्य पक्षांतरे रोखण्यासाठी भाजपकडून हा मधला मार्ग काढण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद द्यावे, अजितदादांची मागणी?
या चर्चेनंतर अमित शाह यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी वन ऑन वन खासगीत चर्चा केली आहे. राष्ट्रवादीची निवडणुकीची तयारी तसेच रणनीतीविषयी चर्चा सुरू असताना अजित पवार यांनी ‘बिहार पॅटर्न’चा दाखला देत जरी कमी जागा असल्या तरी राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद द्यावे, अशी विनंती केली, असे वृत्त द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्राकडून देण्यात आले आहे.
महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या राजकारणाचा इतिहास बघता राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष हे एकमेकांचे पारंपारिक शत्रू राहिलेले आहेत. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात मुख्यत: राष्ट्रवादी विरुद्ध भाजपचे उमेदवार असे साधारण चित्र दिसत असते. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बहुतांश आमदारांनी अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले होते. महायुतीत ज्या पक्षाचा विद्यमान आमदार, ती जागा त्याच पक्षाकडे राहील, असे सूत्र ठरलेले आहे.
परंतु तिथे समोरील पक्षाचा तगडा उमेदवार असल्याने तो राजकीय तडजोड करण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. उदाहरण द्यायचे झाले तर दाखल इंदापूरच्या जागेवरून सुरू असलेला वाद, असे वाद टाळायचे असतील आणि पक्षांतर रोखायचे असतील तर तिथे मैत्रीपूर्ण लढतीचाच पर्याय उपलब्ध आहे, असे प्रदेश भाजपने अमित शाह यांना सांगितले आहे.