पाटणा : बिहारच्या सारण जिल्ह्यात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश झाला आहे. चक्क या बोगस डॉक्टराने युट्यूबवर व्हिडीओ पाहून एका 15 वर्षीय मुलावर शस्त्रक्रिया केली आहे. यात त्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात बोगस डॉक्टरही फरार झाला आहे.
कथित डॉक्टरचे नाव अजित कुमार पुरी असे आहे. तर कृष्ण कुमार असे मृत्यू झालेल्या मुलांचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सारण जिल्ह्यातील गडखा भागातील कथित डॉक्टर अजित कुमार पुरी यानं यू ट्यूब व्हिडीओ पाहून मुलावर किडनी स्टोनचं ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला. मुलाच्या नातेवाईकांनी दावा केला की डॉक्टर मोबाईलवर व्हिडीओ पाहत होता आणि ऑपरेशन करत होता. जेव्हा मुलाची प्रकृती बिघडली तेव्हा त्यानं स्वत:रुग्णवाहिका बोलावून घेतली आणि पाटणाकडे रवाना झाला. मात्र, रस्त्यातच मुलाचा मृत्यू झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला.
दरम्यान, ‘बनावट’ डॉक्टर अजितकुमार पुरी यांच्याकडे का नेले, असे प्रश्न पालकांना विचारला असता, ते म्हणाले, ‘ मुलाला खूप त्रास होत होता. त्याला उलट्या होत असल्याने त्याला लवकर उपचार मिळावे या साठी आम्ही पुरी यांच्या दवाखान्यात गेलो. या ठिकाणी त्याने आमच्या संमतीशिवाय मुलावर शस्त्रक्रिया केली. जेव्हा कुटुंबाने विरोध केला तेव्हा पुरी यांनी पालकांनाच सुनावले. “मी डॉक्टर आहे की तुम्ही?” अशा शब्दात पालकांना डॉक्टरांनी खडसावले.
त्यावेळी मुलाच्या प्रकृतीत काही सुधारणा होत नसल्याने अखेर मुलाला पाटणा येथील रुग्णालयात नेण्यात आले. पण वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पुरी याने मुलाचा मृतदेह सोडून घटनास्थळावरून पळ काढला. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.