बारामती : महाराष्ट्रात सध्या आगामी विधानसभा निवडणुकीचं वार वाहू लागलं आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून राज्यभर फिरून मतदारांशी संवाद साधला जात आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज बारामतीमध्ये पक्षकार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार यांनी लोकसभेला झालेल्या पराभवावर सूचक विधान केलं आहे. विकासकामं करुन देखील जर बारामतीकर वेगळा निर्णय घेणार असतील तर बारामतीला देखील वेगळा आमदार मिळाला पाहिजे. त्यानंतर माझ्या आमदारकीच्या कार्यकाळाची आणि नव्या व्यक्तीच्या कामाची तुलना करावी, असं विधान अजित पवार यांनी केलं आहे.
काय म्हणाले अजित पवार?
मागचं सरकार २०१९ च्या निवडणुकीत २६ नोव्हेंबरला स्थापन झालं होतं. त्यामुळे नवीन सरकार २६ नोव्हेंबरच्या आत स्थापन झालं पाहिजे, असा एक नियम आहे. निवडणूक आयोग कधी निवडणूक घेईल माहिती नाही. खूप जण निधीची मागणी करत आहेत. मात्र, आता मी निधीसाठी फाईलवर रिमार्क काहीही दिला, तरी तो मंजूर होईपर्यंत आचारसंहिता लागेल. त्यामुळे सगळ्यांनी याचा विचार करावा, असं अजित पवार म्हणाले.
तर झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणायचं
पुढे बोलताना म्हणाले, बारामतीमध्ये आपण सर्वांगीण विकास केला. राज्यात सर्वाधिक निधी दिला. मीही एक माणूस आहे. मला कधीकधी विचार येतो की एवढी सगळी कामं करूनही बारामतीकर वेगळा निर्णय घेऊ शकतात. आता मलाही राजकारणात ३३-३४ वर्षं झाली आहेत. मी तर आता दुसरा खासदार राज्यसभेवर पाठवू शकतो.
त्याआधी संसदीय समितीने सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेलांना उमेदवारी दिली होती. मध्ये राजेश विटेकरला आमदार केलं. शिवाजीराव गर्जेंना केलं. आता राज्यपाल नियुक्त आमदारांचं काय होतंय माहिती नाही. पण जर यंदाच्या निकालांसारखी गंमत होणार असेल तर आपली झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणायचं, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
जिथे पिकतं, तिथे विकत नसतं : अजित पवार
आता मीही ६५ वर्षांचा झालो असून मी समाधानी आहे. जिथे पिकतं, तिथे विकत नसतं. एकदा बारामतीकरांना कुणीतरी मी सोडून आमदार मिळायला हवा. मग तुम्ही ९१ ते २०२४ च्या माझ्या कारकिर्दीची आणि त्या नव्या माणसाच्या कारकिर्दीची तुलना करा, असं आवाहन अजित पवार यांनी बारामतीकरांना केलं आहे.