गोरख जाधव
डोर्लेवाडी : डोर्लेवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी आर. टी. कारंडे यांची कायमस्वरूपी बदली करण्याच्या आश्वासनानंतर मागील सात दिवसांपासून सुरु असलेले डोर्लेवाडी (ता. बारामती) येथील ग्रामस्थांचे बेमुदत चक्री उपोषण शुक्रवारी (ता. 06) माघारी घेण्यात आले आहे. बारामतीचे माजी नगरसेवक किरण गुजर यांच्या मध्यस्तीने हे उपोषण मागे घेण्यात आले.
ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी आर. टी. कारंडे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून डोर्लेवाडी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर शनिवारपासून (ता. 31) बेमुदत चक्रीउपोषण सुरू केले होते. त्यास विविध संघटना व ग्रामस्थांनी पाठिंबा दिला होता. 15 ऑगस्टची रद्द केलेली ग्रामसभा घेण्याअगोदर नियमानुसार महिला ग्रामसभा घेणे गरजेचे होते. शिवाय ग्रामसभा घेण्याच्या अगोदर किमान चार दिवस अगोदर गावामध्ये दवंडी देणे गरजेचे आहे.
परंतु सकाळी आयोजित केलेल्या ग्रामसभेची ग्रामपंचायतीने 30 ऑगस्ट रोजीच सकाळी एक तास अगोदर दवंडी दिली होती. याबाबत ग्रामस्थांनी यांच्याशी चर्चा केली असता ग्रामसेवकांनी अरेरावीची भाषा वापरून उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी शनिवारपासून (ता. 31) बेमुदत चक्री उपोषण सुरू केले होते.
पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी एन. टी. जरांडे, कृषी विस्तार अधिकारी एस. एम. गायकवाड, विस्तार अधिकारी एस. के. जगताप यांनी येऊन उपोषणकर्ते यांच्याशी चर्चा केली. मात्र, ग्रामविकास अधिकारी यांची बदली झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याच्या मागणीवर उपोषणकर्ते दादा नवले, जावेद शेख, अॅड. अतुल भोपळे, शंभु भोपळे, ग्रामपंचायत सदस्य सचिन निलाखे, प्रशांत जाधव ठाम असल्याने प्रशासनाबरोबरची चर्चा निष्फळ ठरली होती.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना येथील उपोषणाबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ग्रामस्थांच्या मागणीनुसार ग्रामविकास अधिकारी यांची बदली करून डोर्लेवाडीला नवीन अधिकारी देण्याच्या सूचना केल्याची माहिती किरण गुजर यांनी दिली. त्यानंतर उपोषणकर्ते यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले.