सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दोन मित्रांचा अनोखा योगायोग आला आहे. एकाच वर्गातील दोन मित्रांना एकाच मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे. एवढंच नाही तर दोघांचेही एकच गाव, एकच शाळा, एकच वर्ग, एकच बेंच आणि एकाच मेडिकला कॉलेजला प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे आता हे दोघे एकाच वेळी डॉक्टर होणार आहेत. विघ्नेश गव्हाणे आणि राजवर्धन गुंड अशी या दोन मित्रांची नावे आहेत.
विघ्नेश भास्कर गव्हाणे आणि राजवर्धन राजेंद्रकुमार गुंड हे दोघेही शासकीय अधिकारी व नोकरदारांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडी गावचे आहेत. ते माढा तालुक्यातील निमगाव (टें) येथील श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, माढा येथील सीबीएसई बोर्डाच्या आर्या स्कूलचे एकाच वर्गात शिकलेले आहेत. तसेच या दोघांनाही एकाच वेळी एकाच मेडिकल कॉलेजमध्ये सोलापूर येथे प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे गावाचा नावलौकिक उंचावल्याबद्दल या दोघांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विघ्नेश गव्हाणे याने वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षेत 720 पैकी 620, तर राजवर्धन गुंड याने 720 पैकी 618 गुण मिळवले आहेत. विशेष म्हणजे नीट परीक्षेसाठी मायनस गुण पद्धती आहे. त्यामुळं या दोन्ही गुणी व अभ्यासू विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे उज्ज्वल यश नक्कीच कौतुकास्पद आहे. या दोघांनाही मेडिकल प्रवेशाच्या पहिल्या फेरीत सोलापूर येथील अश्विनी मेडिकल कॉलेज कुंभारी येथे प्रवेश मिळाला आहे.
दोघांच्याही वडिलांनी घेतलं एकत्र शिक्षण
विघ्नेश आणि राजवर्धन या दोघांचेही 10 वी पर्यंतचे शिक्षण माढा येथील आर्या पब्लिक स्कूलमध्ये झाले आहे. तसेच दोघांनीही नीट परीक्षेच्या तयारीसाठी लातूर येथील राजर्षी शाहू कॉलेजमध्ये शिकवणी वर्ग लावले होते. विघ्नेशचे वडील भास्कर गव्हाणे हे म्हैसगाव येथील खासगी साखर कारखान्यात अकौंटंट विभागात कार्यरत आहेत. तर राजवर्धनचे वडील राजेंद्रकुमार गुंड हे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे दोघांचे वडीलही वर्गमित्रच असून दोघांच्या वडिलांनी विठ्ठलवाडी आणि माढ्यात एकत्र शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे विघ्नेश आणि राजवर्धन यांच्या वडिलांच्या मैत्रीनंतर यांचीही नाळ घट्ट झाली आहे.