पुणे : ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत पुरंदर तालुक्यातील वीर गावचे श्रीक्षेत्र श्रीनाथ म्हस्कोबा आणि गुळुंचे येथील ज्योतिर्लिंग देवस्थानच्या विविध विकास कामांसाठी राज्य शासनाकडून सुमारे साडेसहा कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच अष्टविनायकातील प्रसिद्ध गणपती असलेल्या, लेण्याद्री येथील श्री.गिरिजात्मक गणपती देवस्थानला देखील दोन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि आरोग्यदूत युवराज काकडे यांनी यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्याला यश आले असून निधी मंजूर केल्याबद्दल काकडे यांनी शासनाचे आभार मानले आहेत.
पुरंदर तालुक्यातील या दोन्ही दरवस्थांनाना ‘ब’ दर्जा प्राप्त आहे. जेजुरी येथील खंडेरायाप्रमाणेच वीर आणि ज्योतिर्लिंग या ठिकाणी दोन्ही राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. याठिकाणी होणाऱ्या यात्राही मोठ्या प्रसिद्ध आहेत. या दोन्ही देवस्थानचा विकास करण्यात यावा, भाविकांसाठी भक्त निवास, उत्तम प्रतीचे रस्ते, वाहतूक व्यवस्था, पुरेशी प्रकाश व्यवस्था, स्वछतागृह, शौचालय आणि मंदिराभोवती संरक्षक भिंत आदी सुविधा मिळाव्यात, यासाठी युवराज काकडे हे सातत्याने प्रयत्न करत होते. या मागणीला अपेक्षीत यश आले असून शासनाने निधी मंजूर केला आहे.
शासनाच्या ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत वीर येथील म्हास्कोबा देवस्थानच्या विकासकामांसाठी २ कोटी ७५ लाख ९७ हजार तर गुळुंचे येथील ज्योतिर्लिंग देवस्थानच्या विकासकामांसाठी ३ कोटी ७१ लाख ६१ हजार असा सुमारे साडेसहा कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. या निधीतून भक्त निवास, संरक्षक भिंत, शौचालय, पथदिवे आदी विकासकामे करण्यात येणार आहेत. हा निधी मंजूर केल्याबद्दल युवराज काकडे यांनी शासनाचे आभार मानले आहेत.
गोष्ट श्रीक्षेत्र वीर म्हस्कोबा देवस्थानची…
श्रीक्षेत्र वीर म्हस्कोबा देवस्थानला विकासासाठी निधी मिळवून दिल्यानंतर आरोग्यदूत युवराज काकडे म्हणाले की, गेल्या जुलै महिन्यात थेऊर येथील पत्रकार मित्र गणेश ऊर्फ बापू धुमाळ यांच्या जत्रेच्या कार्यक्रमानिमित्ताने, पहिल्यांदा श्रीक्षेत्र वीरला जाण्याचा योग आला. यावेळी जेवणाच्या पंगती, असलेली गर्दी यामुळे उपस्थित असलेल्या गावकऱ्यांशी गप्पा मारत असताना बापू आणि मंगेश धुमाळ यांनी स्थानिक विश्वस्त असलेले त्यांचे बंधू अमोल धुमाळ यांच्याशी ओळख करु दिली. यावेळी अमोल यांच्याशी गप्पा मारताना देवस्थानबद्दल चर्चा सुरू होऊन, ती देवस्थानच्या विकास कामांवर येऊन थांबली. यावेळी त्यांनी येथे आवश्यक असलेल्या, विकास कामांच्या निधीबाबत विनंती केली.
त्याचक्षणी मी तेथूनच पुणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना व स्थानिक पदाधिकाऱ्यांना फोन करून, देवस्थानबाबतची माहिती घेतली. त्यांनी सदर देवस्थानला शासनाचा ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त होऊन ८ वर्षे झाली, परंतु अद्याप निधी मिळाला नसल्याचे सांगितले. तेथून पुढे याबाबतच्या बैठका आणि धावपळ सुरू झाली आणि आज २ महिन्यांच्या आत तब्बल २ कोटी ७५ लक्ष रुपये निधी मंजूर होऊन ही धावपळ थांबली. धुमाळ कुटुंबियांच्या जत्रेच्या कार्यक्रमाला जाण्याचा योग आला आणि हे सर्व काही घडू शकले. तसेच या सोबतच गुळूंचे येथील देवस्थानचाही विषय याअनुषंगाने मार्गी लागला, असं देखील युवराज काकडे म्हणाले.