युनूस तांबोळी
शिरूर : टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील शिनगरवाडीत बुधवारी (दि.४) रात्रीच्या सुमारास विद्युत रोहित्र चोरीचा प्रयत्न झाला. गुरूवारी सकाळी वीजपुरवठा बंद असल्याने येथील सामजिक कार्यकर्ते दत्तात्रय दिवेकर यांनी पाहणी केली असता रोहित्राचे नट-बोल्ट खोलून चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
यापूर्वीच्या रोहित्र चोरीच्या घटना पाहता रोहित्र खांबावरून खोलून खाली टाकल्याचे तसेच त्यामधील ऑइल सोडून आतील तांबे काढून घेतल्याचे निदर्शनास आले होते. मात्र यावेळी चोरांनी नवीन शक्कल लढवून खांबावरतीच रोहित्राच्या वरील बाजूस नट-बोल्ट खोलल्याचे निदर्शनास आले आहे. त्यावेळी कुणीतरी आल्याची चाहूल चोरांना लागली असावी म्हणून सदर रोहित्र चोरी जाण्यापासून किंवा नुकसान होण्यापासून वाचल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
काही दिवसांपूर्वी एलसीबी व शिरूर पोलिसांनी विदयुत रोहीत्र चोरांना पकडले होते. या चोरांना पकडल्यानंतरही सविंदणे, निमगाव दुडे आणि आमदाबाद येथून विद्युत रोहीत्र चोरीला गेले. त्यावेळी रोहित्र चोरांच्या अनेक टोळ्या कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर या चोऱ्यांचे प्रमाण कमी झाल्याने पोलीस विभाग शांत असल्याचे निदर्शनास आले.
हा प्रकार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना व्हायला हव्यात त्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. अशी भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. चोर पकडले तरी ते पुन्हा नव्याने सक्रिय होतात. हे नित्याचेच झाले आहे. लाखोंचे होत असलेले नुकसान वाचविण्यासाठी महावितरण रोहित्रांजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवू शकत नाहीत का, असा सवाल ग्रामपंचायत सदस्य अर्जुन खामकर, भरत खामकर, प्रियांका दिवेकर तसेच येथील शेतकरी अमोल रसाळ, इंदर खामकर, अनिल पखाले यांनी केला आहे.
पोलीस निरीक्षक केंजळेंकडून दबंग कामगिरीची अपेक्षा…
शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांची बदली झाल्याने यांच्या जागी नव्यानेच संदेश केंजळे यांची नियुक्ती झाली आहे. शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हेगारीचे उच्चाटन करण्यासाठी तसेच जुगार, मटका, गुटखा विक्री, अवैध दारु, गांजा विक्री, गॅस रिफिलींग व्यवसाय या अवैध धंद्यांना आवर घालण्यासाठी प्रयत्न होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरेल. शिरूरकरांना केंजळे यांच्याकडून दबंग कामगिरीची अपेक्षा आहे.