उरुळी कांचन : गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, जबरी चोरी व इतर अशा 10 ते 15 चोरीच्या घटना घडल्या आहेत. उरुळी कांचन पोलीस सुरक्षेच्या दृष्टीने कमी पडत असल्याचे चित्र सध्या शहरात घडत असलेल्या गुन्ह्यांच्या घटनांवरून सिद्ध होत आहे. ठराविक दिवसांच्या अंतराने होणाऱ्या घरफोड्यांमुळे ‘चोरांनो या, उरुळी कांचनमध्ये आपले स्वागत आहे’ असा फलक लावण्याचे बाकी राहिले की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील आणि आश्रम रोड परिसरातील आयडीबीआय बॅंकेजवळ असलेले वेदांत मेडीकल अॅन्ड जनरल स्टोअर्स अज्ञात चोरट्यांनी शनिवारी (ता. 31) मध्यरात्री फोडत 1 लाख 60 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शशीकांत रावु गुंजाळ (वय 44, व्यवसाय मेडीकल, रा. पार्थ सार्थ बिल्डिंग, आयडीबीआय बॅंकेजवळ, आश्रमरोड उरूळी कांचन ता. हवेली) यांनी तक्रार दिली आहे.
उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीसह अन्य अवैध व्यवसायावर थेट कारवाई करणार असल्याचे संकेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिले होते. तसेच ‘कायद्यात राहाल, तर फायद्यात राहाल’, असा सज्जड इशाराही दिला होता. तरीही दिवसेंदिवस अवैध व्यवसाय जोमात असून चोरट्यांची व गुन्हे करणाऱ्यांची हिंमत वाढतच चालली आहे. उरुळी कांचन पोलिसांना अद्यापपर्यंत चोरीच्या गुन्ह्यांतील धागेदोरे न मिळाल्याने कायदा आहे त्या ठिकाणी आहे. याचा फायदा चोर घेत आहेत, अशी चर्चा रंगू लागली आहे.
उरुळी कांचनसह परिसरातील गुंडगिरी, किरकोळ कारणांवरून भांडण, मारामारी, गांजा, गुटखा, वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. तरीही उरुळी कांचन पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई अद्यापपर्यंत करण्यात आली नाही. उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, दुचाकी चोरी, दोन गटांतील भांडणांसह अन्य गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे.
वर्दळीच्या ठिकाणी चोरी, अपार्टमेंटमध्ये चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पार्किंग असो वा रस्त्यालगत, मंदिराजवळ तसेच दुकानाजवळ लावलेल्या दुचाकी व चारचाकी चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याबाबत उरुळी कांचन पोलिसांकडून नागरिकांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, उरुळी कांचन पोलिसांकडून नागरिकांचा अपेक्षा भंग झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.
दरम्यान, कोटींची उलाढाल असलेली बाजारपेठ, शेतीमाल निर्यातीचे केंद्र, रोजगाराची उपलब्धता आणि दौंड, शिरूर व पुरंदर अशा तीन तालुक्यांशी थेट कनेक्टव्हीटीमुळे शहरातील नागरिकरण झपाट्याने विस्तारले आहे. अशा पूरकस्थितीमुळे मजुरांपासून सरकारी कर्मचारी, व्यापाऱ्यांची उरुळी कांचन व परिसराला पसंती असते. दीड लाखाच्या पुढे फक्त उरुळी कांचनची लोकसंख्या पोचली आहे. आर्थिक सुबत्तेमुळे वर्षभरापासून चोरट्यांची वाकडी नजर उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीवर पडली आहे.
चोरट्यांचा बंदोबस्त कधी?
पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी पाच महिन्यांपूर्वी उरुळी कांचन पोलिस निरीक्षकपदाची सूत्रे घेतली आहेत. त्यांनी केलेल्या कामाचा ‘सिंघम’ अवतार उरुळी कांचन परिसरातील चोरांना बेड्या ठोकत कधी दाखविणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे पोलिसांच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. चोरट्यांवर दहशत बसविण्यासाठी पेट्रोलिंगसह उपक्रम राबवायला हवेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
गेल्या 6 महिन्यांमधील गुन्हे
खून – 0
प्राणघातक हल्ले – 02
दुखापत, मारहाण – 15 ते 20
खंडणी – 0
जबरी चोऱ्या, चोऱ्या, घरफोड्या – 12 ते 15
वाहनचोरी – 6