पुणे : खडकवासला धरणातून २५ जुलै रोजी झालेल्या पाण्याच्या विसर्गानंतर पुण्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या पूरस्थितीबाबतची नेमकी कारणे शोधण्यासाठी पुणे महानगरपालिकेने तीन सदस्यांची समिती नेमली होती. या समितीचा अहवाल अजून तयार झालेला नाही. याबाबत ही समिती पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्याबरोबर चर्चा करून अहवाल तयार करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
धरणातून विसर्ग झाल्यावर पुण्यात नदीचे पाणी शिरले होते. त्यात अनेक नागरिकांचे संसार वाहून गेले होते. या परिस्थितीला नदीपात्रातील राडारोडा, भराव तसेच नदीकाठ सुधार योजनेचे काम कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच अनेक नवीन नवीन कारणे आता पुढे येऊ लागली आहेत. त्यामुळे नेमकी कारणे शोधण्यासाठी पालिकेने तीन जणांची समिती तयार केली आहे.
या समितीमध्ये पथ बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे, कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे, ड्रेनेज विभागाचे दिनकर गोंजारी आणि आमंत्रित सदस्य म्हणून जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप यांचा समावेश करण्यात आला आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्तांशी चर्चा करून अंतिम अहवाल सादर केला जाणार असल्याचे समितीमधील सदस्यांचे म्हणणे आहे.