मुंबई : राज्य परिवहन कर्मचारी संघटनेने बेमुदत संप पुकाराला आहे. यामुळे एसटी कर्मचारी संघटना आजपासून बेमुदत आंदोलन करत आहेत. त्यामुळे राज्यातील एसटींची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली असून राज्यभरातील प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसत आहेत. ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने चाकरमान्यांचे सुद्धा हाल होत आहेत. आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
“एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल आम्ही उद्या बैठक बोलवलेली आहे. यापूर्वीही एक बैठक पार पडली आहे. एसटी ही गावोगावी जाणारी आहे. त्यासाठी उद्या बैठक बोलवण्यात आलेली असून त्यात सकारात्मक चर्चा होणार आहे. गणेशोत्सव जवळ आला आहे. अनेक नागरिक खरेदी विक्री करण्यासाठी बाजारपेठामध्ये जाण्यासाठी एसटीचा वापर करतात. त्यामुळे माझे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन आहे की तुम्ही संप करु नका. आपण याबद्दल सकारात्मक चर्चा करु आणि चर्चेतून तुमचाही प्रश्न सुटेल”, असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
प्रवाशांचे हाल..
राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी संघटनेकडून सेवा बंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे राज्यातील एसटींची वाहतूक विस्कळीत झाली असून एसटीच्या संपामुळे राज्यभरातील प्रवाशांचे हाल होत आहे. ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांकडून संप पुकारण्यात आल्याने चाकरमान्यांचे सुद्धा हाल होताना दिसत आहे.
प्रमुख मागण्या कोणत्या?
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे, प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक, वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक, वेतनवाढीच्या दराचा फरक मिळावा यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. तसेच 4849 कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचे वाटप करण्यात यावे. त्यासोबतच मूळ वेतनात जाहीर केलेल्या 5000, 4000 आणि 2500 रुपयांऐवजी सरसकट 5000 हजार रुपये मिळावेत, अशी मागणी एसटी कर्माचाऱ्यांकडून केली जात आहे.