बारामती : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुका लवकरच घेतल्या जाणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणीही केली जात आहे. असे असताना यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर याला अजित पवार यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘सध्या काहीजण काहीही बोलत आहेत पण त्यांना बोलू द्या. या गोष्टीला महत्त्व देऊ नका’, असे ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यभर जनसन्मान यात्रा सुरु आहे. सोमवारी (दि.2) ही जनसन्मान यात्रा बारामतीत होती. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला. यातच महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यावर अजित पवार म्हणाले, ‘आता काही लोकं सांगत आहेत की दादा बारामतीत आता वेगळंच वाटतंय. आधी एवढे पवार घरी येत नव्हते. आता लई पवार घरी यायला लागले आहेत. आता सर्व पवार विचारपूस करत आहेत’.
तसेच गेल्या 25-30 वर्षांत कोणी आलं नाही. मात्र, आता काय रे बाबा तुझं कसं आहे? असं सर्वजण विचारत आहेत. मी म्हटलं चांगलं झालं ना, तुम्हालाही बरं वाटतं. आधी जे पवार फक्त मत मागत होते. आता ते पवार घरोघरी आणि दारोदारी फिरायला लागले आहेत. मग त्यामध्ये दोन्ही बाजूचे पवार फिरत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
आम्ही कुठं म्हटलो की…
ते पुढे म्हणाले, ‘काहीजण काहीही बोलत आहेत. बोलू द्या. आपल्या अंगाला भोकं पडत नाही. काहीजण सांगतात सकाळी कोण उठा म्हणते? आम्ही कुठे म्हटले की तुम्ही उठा म्हणताहेत. कोण म्हणतो दुधवालाही सकाळी उठतो. उठतो ना, मी कधी म्हटले की दूधवाला दुपारी उठतो. मी म्हटलोच नाही. या गोष्टीला महत्त्व देऊ नका. माझी कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे’, असे म्हणत त्यांनी अधिक बोलणं टाळलं.
जसं मी ठरवलंय, तसं कार्यकर्त्यांनी ठरवायचंय
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘वैयक्तिक स्वरुपाची टीका टिप्पणी…तो काय म्हणाला, त्यावर मी काय बोलणार? मग मी मत व्यक्त करणार. यात वेळ वाया घालवू नका. केवळ राजकीय स्वरुपाच्या टीकाटिप्पणी टाळून विकासावरच बोलायचे असे मी ठरवले आहे. जसे मी ठरवले आहे, तसे कार्यकर्त्यांनी ठरवायचे आहे’.
काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?
यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, ‘कोणी कुणावर उपकार करत नाही. हे सांगतात आम्ही दिवसरात्र काम करतो. आम्ही तुम्हाला आग्रह केला होता का? तुम्हाला हौस आहे, आमदार आणि मंत्री व्हायची; त्यामुळे काम करा. आमच्यावर उपकार करता का?’ असे त्या म्हणाल्या होत्या.
महाराष्ट्रात नेतेमंडळींचे वाढले दौरे
विधानसभेची निवडणूक काही दिवसांत होणार आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणातील घडामोडींना वेग आला आहे. सध्या जवळपास सर्वच पक्षाचे नेत्यांचे महाराष्ट्रात दौरे सुरु आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीचा आढावा घेतला जात आहे. सभा, मेळावे आणि बैठका घेत आगामी निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. त्यातच अजित पवार यांची बारामतीत सभा झाली.