ठाणे : राज्यात महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढता दिसत आहेत. बदलापूरमधील दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना ताजी असताना आता कल्याण ग्रामीणमध्ये असाच पराक्र घडल्याचे समोर आले आहे. दोन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घराच्या अंगणात खेळत असलेल्या दोन वर्षीय चिमुकलीचे अपहरण करत निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर 35 वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे.
कल्याण ग्रामीण तालुका पोलिस ठाण्यात या प्रकरणी अपहरणसह लैंगिक अत्याचार, पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या नराधमाला अटक करण्यात आलिया आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांनी तातडीने कल्याण ग्रामीण तालुका पोलिस ठाण्यात जात, नराधमावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास केला आणि नराधम आरोपीला अटक केली आहे. नराधमाला कल्याण न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सात महिन्यात 233 अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार..
ठाणे शहर पोलिस आयुक्तांच्या हद्दीतील पाच पोलिस उपआयुक्त कार्यलयाच्या हद्दीत 35 पोलिस ठाणे येतात. या विविध पोलिस ठाण्यात या गेल्या सात महिन्यात 233 अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्याचे समोर येत आहे. या प्रकरणात पोक्सो कायद्यानुसार गुन्हे दाखल करत आरोपी नराधमांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.