शिरुर : गणेगाव खालसा (ता. शिरुर) ग्रामपंचायत हद्दीतील दोन महिलांच्या जमिनीतील मुरुमाची परस्पर विक्री केल्याप्रकरणी शिरुर पंचायत समितीच्या उपसभापती सविता पऱ्हाड यांच्या पतीसह चौघांवर मुरूम चोरी प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रमोद पऱ्हाड, महेंद्र पऱ्हाड (रा. दोघेही केंदूर ता. शिरुर) हेमंत ढमढेरे (रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर, सध्या रा. खराडी बायपास चंदननगर पुणे) व प्रवीण दंडवते (रा. गणेगाव खालसा ता. शिरुर) अशी गुन्हा नोंद केलेल्यांची नावे आहेत.
तर याप्रकरणी राजश्री अंकुश मोरे (वय – ४२ रा. न्हावरा रा. शिरुर) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेगाव खालसा ग्रामपंचायत हद्दीत राजश्री मोरे व नंदाबाई साळवे यांची जमीन आहे. सन २०२० साली राजश्री मोरे व नंदाबाई साळवे यांना शिरूर तहसील कार्यालयाच्या वतीने नोटीस देण्यात आली होती.
बेकायदा मुरूम उत्खनन केल्याने या दोघीना तब्बल सहा कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा दंड का ठोठावण्यात येऊ नये, अशी विचारणा नोटिशीद्वारे करण्यात आली होती.
राजश्री मोरे यांनी तहसिलदार यांच्याकडे आपले म्हणणे मांडताना सादर जागेतील उत्खनन प्रमोद पऱ्हाड, महेंद्र पऱ्हाड, हेमंत ढमढेरे, प्रवीण दंडवते यांनी केले असल्याचे सांगितले होते.
त्यावर तहसीलदार यांनी या प्रकरणी सव्वीस लाख बहात्तर हजार रुपये दंड भरण्याबाबतचे आदेश दिले आजसारही मोरे व नादाबाई साळवे यांना दिले.
या विरोधात राजश्री मोरे यांनी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. यावर सदर आयोगाने त्याबाबतचा अहवाल तहसीलदार यांच्याकडून घेत घडलेल्या प्रकारात अहवालानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, त्यानंतर राजश्री अंकुश मोरे यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार वरील चौघांवर रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे हे करत आहे.