पुणे: दारूच्या नशेत पोलीस नियंत्रण कक्षाला खोटी माहिती देऊन दिशाभूल करणाऱ्या तरुणाविरुद्ध पोलिसांनी गुरुवारी (दि. २९) गुन्हा दाखल केला. रोहित मुकेश चव्हाण (रा. गणेश पेठ) हे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. यासंदर्भात पोलीस कर्मचारी विवेक पाटील यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.
चव्हाण मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयासमोर थांबला होता. दारूच्या नशेत त्याने पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात (कंट्रोल रूम) संपर्क साधला. ‘मला पोलीस मदत हवी आहे. ३० ते ४० जण तलवार घेऊन मंगळवार पेठेत फिरत असून, माझ्या जिवाला धोका आहे,’ अशी माहिती त्याने मोबाइलवरून पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षाने त्वरित फरासखाना पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा चौकशीत असा प्रकार घडला नसल्याचे उघड झाले. मात्र यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. पोलिसांची दिशाभूल करून खोटी माहिती दिल्याप्रकरणी चव्हाणविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.