पुणे: सर्रास पोलिसांचे आदेश धुडकावत दहीहंडी मंडळांनी लेझर बीम लाईटचा वापर केल्याने हडपसरमधील ३ व सहकारनगरमधील १ अशा चौघा दहीहंडी संयोजकांवर गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, पोलिसांचा आदेश आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलेल्या आवाहनाला मात्र मंडळांनी काणाडोळा करत धिंगाणा घातला. त्यामुळे आता गणेशोत्सवात तरी या बेशिस्तीला चाप बसणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात दहीहंडी उत्साहात साजरी केली.
मंडळांनी डीजे तसेच लेझर बीम लाईटचा वापर सर्रास केल्याचेही दिसून आले. शहरात अनेक ठिकाणी लाईट शोसाठी एक दिवस आधीपासूनच तयारी केली जात होती. मात्र, त्यावर स्थानिक पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही. पोलिसांकडे दहीहंडीदरम्यान आवाज व लेझर बीम लाईटच्या अतिवापराबाबत नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया आल्या. त्यानंतर दहीहंडी आयोजकांवर कारवाईला सुरुवात झाली. पोलिसांच्या हेल्पलाइनवर तक्रारी प्राप्त झाल्यानंतर याची पडताळणी सुरू केली आहे.