लोणी काळभोर, (पुणे) : जुनी आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी पूर्व हवेलीतील कुंजीरवाडी आधारकेंद्रांवर पहाटे चार वाजल्यापासून मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. कुंजीरवाडी, सोरतापवाडी, उरुळी कांचन, ग्रामपंचायत हद्दीत आधार केंद्र सुरु आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी आधारकार्ड आवश्यक आहेत. तरी नागरिकांनी एकाच आधार केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहन कुंजीरवाडी येथील आधार केंद्र चालक राज गायकवाड व इतर चालकांनी केले आहे.
कुंजीरवाडी येथील आधार केंद्रावर, सोरतापवाडी येथील बँक ऑफ बडोदा, उरुळी कांचन येथील जिजाऊ सभागृह, पोस्ट ऑफिस कार्यालय, तसेच राम मंदिराजवळ आधार केंद्र व यवत येथे दोन ठिकाणी आधार अद्ययावत करणे सुरु आहे. आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी आधार केंद्रांवर एकाच ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन आधार केंद्र चालकांकडून करण्यात येत आहे.
पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, उरुळी कांचन या गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात पहाटे चार वाजल्यापासून नागरिक आधार केंद्रावर गर्दी करू लागले आहेत. गर्दी करून गोंधळ सदृश स्थिती निर्माण करीत आहेत. आधारकेंद्र चालकांनी वारंवार सांगूनही त्याच्याशी हुज्जत घालण्याचे प्रकार सध्या सुरु झाले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी एकाच ठिकाणी गर्दी व गोंधळ न करता आपल्या जवळ असलेल्या आधार केंद्रावर संपर्क करावा.
सध्या राज्यभरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी युद्धपातळीवर सुरू आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनाही राबवली जात आहे. या दोन्ही योजनेच्या ऑनलाइन नोंदणीसाठी आधारकार्ड आवश्यक आहे. दोन्ही योजनांसाठी वयाची अट असल्याने आधार कार्डवरील जन्मतारीख ग्राह्य धरण्यात येत आहे. तसेच लाडकी बहीण नोंदणीसाठी मोबाईलवर ओटीपी येत आहेत. त्यासाठीही योग्य फोन नंबर आवश्यक असल्याने गर्दी होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
दरम्यान, याबाबत बोलताना आधार केंद्र चालक राज गायकवाड म्हणाले, ” मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे आधार केंद्रावर नावात बदल करणे यासाठी मोठी गर्दी केली जात आहे. तरी राज्य शासनाने सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदत वाढवली असून नागरिकांनी आधार केंद्रावर गर्दी करू नये.