नाशिक : राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. बदलापूरच्या शाळेत तर दोन चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला, तर मुंबईत एका नराधम पित्याने त्याच्याच 9 वर्षांच्या मुलीचे शोषण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून संपूर्ण राज्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असताना नाशिकमध्ये मुलीची छेड काढल्याने आईने टवाळखोरांना चोप दिल्याची घटना घडली आहे. या महिलेच्या धाडसाचे आता सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या सिडको परिसरातील हेडगेवार नगरमध्ये बुधवारी (ता.28) दुपारी एक वाजता एका तरुणीला अश्लील हावभाव करत छेड काढली. तरुणीने आपल्या आईला याबाबतची माहिती दिली. त्या महिलेने टवाळखोर उभे असतात तिथे जाऊन ओळख पटविण्यासाठी मुलाला बोलावून घेतले. दरम्यान, टवाळखोराला जाब विचारला असता त्याने हुज्जत घालण्यास सुरवात केली.
यानंतर महिलेचा पारा चढला आणि महिलेने रणरागिणीचे रूप धारण करून टवाळखोरांना चोप देण्यास सुरुवात केली. बाजूनेच भंगार विक्रेत्याची हातगाडी जात असताना त्यावरची खर्ची उचलून महिला आणि तरुणींनी छेड काढणार्यांना धडा शिकवला. यावेळी इतर टवाळखोर घाबरुन तिथून पळ काढले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, या तरुणींचे धैर्य आणि साहसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
दरम्यान, मुलींच्या, महिलांच्या सुरक्षेवरून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. मात्र याच पार्श्वभूमीवर महिला, युवतींना स्वसंरक्षणाची जबाबादारी घेतली पाहिजे, असे सांगत जनजागृती करण्यात येत आहे.