भिगवण : उजनी धरणाच्या निर्मितीनंतर भिगवण येथील मोठ्याप्रमाणावर शेतजमीन ही धरणाचे पाणी अडविण्यासाठी संपादित करण्यात आली होती. या संपादित क्षेत्रांवर उजनी संपादित’ असा शेरा मारला गेला. त्याबदल्यात मुळमालकांना पर्यायी जमीन किंवा परतावा हा शासनाकडून देण्यात आला होता. धरणाची पाणी पातळी कमी झाल्याने भिगवण येथील उजनी धरणातील संपादित क्षेत्रात मुरूम, दगडगोटे भरून त्यावर मोठमोठाले पत्र्याचे शेड उभारून मूळ प्रवाहाला धोका पोहचेल असे कृत्य केले आहे.
सदर बाब ही गंभीर स्वरूपाची मानून भिमा उपसा सिंचन पळसदेवचे उपविभागीय अभियंता नितीन मधुकर खाडे यांनी भिगवण पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून जागामालक तुकाराम लक्ष्मण भापकर व अनधिकृत पत्र्याचे शेड मारणारे दुकानदार प्रविण चौण्डकर (दोन्ही रा. भिगवण ता. इंदापूर जि. पुणे) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत भिगवण पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, भिगवण-राशीन रोडलगत उजनी संपादित असणाऱ्या शेतजमिनीमध्ये तुकाराम लक्ष्मण भापकर व प्रविण चौण्डकर यांनी उजनी जलाशयामध्ये राडा, रोडा, मुरूम, माती टाकले. उजनी जलाशयातील पाण्यामध्ये अनधिकृतपणे जलप्रवाह आडवून, त्यामध्ये भराव तयार केला. तसेच त्यावर पत्रा शेड करून उजनी जलाशयाचा पाणीसाठा कमी केले. तसेच पर्यायाने शासकीय जागेवर विनापरवानगी अतिक्रमण करून जलाशयाचे नुकसान केले आहे. म्हणून त्यांच्यावर रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेचा अधिक तपास पोलीस अंमलदार शैलेश हंडाळ हे करीत आहे.