लोणी काळभोर, (पुणे) : अष्टविनायक तीर्थक्षेत्रापैकी प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या श्री क्षेत्र थेऊर (ता. हवेली ) येथील चिंतामणी मंदिरात संकष्टी चतुर्थीनिमित्त शनिवारी (ता.१६ ) चिंतामणीच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल झाले होते. सकाळपासून दर्शनासाठी भाविकांच्या लांब रांगा लागल्या होत्या. मंदिर परिसराला जणूकाही यात्रेचे स्वरूप आले होते.
मंदिर परिसरात गावठी भाज्या, फळे, काजूगर, कोकम, कंदमुळे व रानमेवा घेऊन अनेक विक्रेते बसले होते. देवळात येणारे भाविक आवर्जून ते खरेदी करत होते. मंदिर परिसरातील दुकाने व हॉटेल ग्राहकांनी गजबजले होते. परिसरातील हॉटेल, खेळण्याची व शोभिवंत वस्तुंची दुकाने, नारळ, हार, फुल व पापड मिरगुंड, कडधान्य विक्रेते, प्रसाद व पेढेवाले यांच्या दुकानावर मोठी गर्दी झाली. त्यामुळे मंदिर परिसरात मोठी वर्दळ पहायला मिळत होती.
चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आनंद महाराज तांबे म्हणाले, मागील चार दिवसापासून दिवस रात्र होत असलेल्या पावसाने शुक्रवारी दिवसभर उघडीप दिल्याने भाविक मोठ्या संख्येने चिंतामणीच्या दर्शनासाठी दाखल झाले होते. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास विद्याधर आगलावे यांच्या हस्ते ‘श्रीं’ ची पूजा करून सकाळी सहा वाजल्यापासून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले.
संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात विविध प्रकारची फुले वापरून आकर्षक रांगोळी, फुलांची आरास, पायघड्या सावलीसाठी मंडप व्यवस्था तसेच भाविकांसाठी स्वच्छता ग्रहाची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी भाविकांना देवस्थानच्या वतीने उपवासाची खिचडीचे वाटप करण्यात आले.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच थेऊर ग्रामपंचायतीतर्फे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. व्यवस्थापक मंगलमूर्ती पोफळे, मोरेश्वर पेंडसे यांनी मंदिर परिसरात सहकार्य केले. तर आनंद महाराज तांबे हे मंदिर परिसरात लक्ष देऊन होते.