मुंबई : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणात ब्लेम गेम सुरु आहे का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, पुतळ्याची जबाबदारी ही पूर्णपणे राज्य सरकारची असून ते नाकारू शकतं नाहीत. राज्यात कुठंही आणि कुणाचाही पुतळा उभारायचा असल्यास राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते. येथे पुतळ्याच्या उद्घाटनासाठी प्रामुख्यानं राज्य सरकारचे प्रतिनिधी तसेच स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी अनावरण करण्यासाठी आले होते, त्यामुळे ही सर्व जबाबदारी राज्य सरकारची आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
मुंबईत आज महाविकास आघाडीची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शरद पवार बोलत होते.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, सरळ गोष्ट आहे, यामध्ये राजकारण काय आहे. शिवाजी महाराजांच्या काळामधील एक गोष्ट लोकांना भावली. त्यांच्या कार्यक्षेत्रात रांझ्याच्या पाटलानं एका भगिनीवर अत्याचार केले. ही तक्रार शिवाजी महाराजांकडे आल्यानंतर त्यांनी त्याचे दोन हात कलम केले होते. या प्रकरणांमध्ये महाराजांची नीती काय हे त्यांनी समोर ठेवलं. एका भगिनीला त्रास दिल्यावर सक्त निर्णय त्यांनी घेतला होता. आज तसा निर्णय घेणाऱ्या राजाची प्रतिकृती समुद्रावर ज्यावेळी तयार करुन आणली गेली. ती तयार करताना जो भ्रष्टाचार केला गेला त्यामुळं आज ती मूर्ती उध्वस्त झाल्यासारखी दिसत आहे, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.
तसेच कोण सांगतं वारं होतं, कोण काही सांगतं, जिथं प्रधानमंत्री जाऊन आले, त्यांच्या हस्ते अनावरण झालं. आज या ठिकाणी भ्रष्टाचार किती टोकाला गेला आहे. कुठे भ्रष्टाचारी भूमिका घेऊ नये याचं तारतम्य सुद्धा या सरकारमध्ये नाही. त्यामुळे शेवटी लोकांच्यामध्ये तीव्र भावना आहे. ती या कार्यक्रमाच्या माध्यमातून उभी करावी यासाठी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करुन हा कार्यक्रम हाती घेतला आहे, असंही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.