अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : जांबूत (ता. शिरूर) येथील ५५ वर्षीय महिला बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना सोमवार (दि.२६) रोजी घडली आहे. जांबुतच्या बाग वस्ती परिसरात ही घटना घडली आहे. मुक्ताबाई भाऊ खाडे असे या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. यामुळे वन विभागाचा गलथान कारभार समोर आला असून शिरूर वनविभागाविरुद्ध नागरिकांचा प्रंचड रोष वाढलेला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी हे मनमानी कारभार करत असून ठोस उपाययोजना राबवताना दिसून येत नाही.
सदर महिला ही रविवारी (दि.२५) रोजी सायंकाळपासून बेपत्ता होती. परिसरात शोधाशोध करूनही मुक्ताबाई खाडे यांचा शोध लागला नाही. सदर भागात बिबट्याचे मोठे वास्तव्य असून संशय निर्माण झाल्याने कुटुंबीयांनी वनविभागाच्या कर्मचारी व अधिकारी यांना या घटनेची माहिती दिली.
यावेळी वनविभागाकडून परिसरातील शेतांमध्ये शोधाशोध सुरु झाली. तेव्हा सायंकाळी चार वाजेच्या सुमारास आजूबाजूच्या उसाच्या शेतात शोध घेतला असता या महिलेचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे जांबूत आणि परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून तातडीने पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे. कार्यालयात वनपरिक्षेत्र आधिकारी दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशी म्हणण्याची वेळ शिरूर तालुक्यातील जनतेवर आलेली आहे.