बीड : राज्यात सध्या आगामी विधानसभा निवडणूकांचे वारे वाहू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष कंबर कसून तयारीला लागलेले दिसून येत आहे. अशातच मात्र आता महायुतीमध्ये धुसफूस असल्याची माहिती समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा बीडमध्ये दाखल होण्यापूर्वीच महायुतीतील धुसफुस उघड झाली आहे. बीड विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाच्या अनिल जगतापांनी दावा केल्यानंतर आता अजित पवार गटाचे नेते योगेश क्षीरसागर यांनी सुद्धा याच विधानसभा मतदारसंघावर दावा केल्याने महायुतीत मिठाचा खळा पडल्याचे बोललं जात आहे.
महायुतीत नाराजी नाट्य..
विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच बीडच्या जागेवरून महायुतीत नवा रस्सीखेच बघायला मिळत आहे. 1990 पासून बीड विधानसभेची जागा ही युतीतून शिवसेनेकडे आहे. यावरूनच आता शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप या जागेवर दावा करत असताना दिसून येत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे वर्चस्व या जागेवर आहे. आणि आता अजित पवार गटाकडे घड्याळीचे चिन्ह आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाकडून बीड विधानसभेवर दावा केला जात आहे. दोन्ही गटाच्या पक्षप्रमुखांकडून हा पेच सोडवण्याचं मोठं आव्हान असणार आहे.
कोणत्या गटाच्या वाट्याला येणार बीड विधानसभा?
शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून ते निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं सांगितले आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाचे नेते योगेश क्षीरसागर सुद्धा जोरदार कामाला लागले असून बीड विधानसभेची निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे या दोघांकडूनही या जागेवर दावे केले जात आहेत.