धुळे : धुळें जिल्ह्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. धुळे तालुक्यातील बाळापुर व फागणे गावालगत असलेल्या कोती नाला पूल व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मोटारसायकला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात पुलावर पडलेल्या खड्ड्यामुळे झाल्याच बोललं जात आहे.
मृतदेह बराच वेळ रस्त्यावर पडून..
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे तालुक्यातील बाळापूर-फागणे गावालगतच्या पुलावर हा अपघात झाला असून अपघात इतका भीषण होता की अपघातात दुचाकी चक्काचूर झाली आहे. दरम्यान अपघातात मृत झालेल्या इसमाचा मृतदेह बराच वेळ रस्त्यावर तसाच पडून असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी या संदर्भात प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर सुद्धा प्रशासनाचा कुठलाही अधिकारी किंवा कर्मचारी या ठिकाणी आला नसल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे. स्थानिकांच्या मदतीने ॲम्बुलन्स बोलावून संबंधित मृत व्यक्तीचा मृतदेह हा ॲम्बुलन्स मध्ये टाकून शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे,
संबंधित मृत व्यक्ती हा पोलीस पाटील असल्याची माहिती मिळत आहे. हा अपघात खड्ड्यांमुळेच झाला असल्याचा अंदाज स्थानिकांतर्फे व्यक्त करण्यात येत आहे. पुलावर मोठ्या प्रमाणात खड्ड्याचं साम्राज्य पसरल असून यापूर्वी देखील या खड्ड्यांमुळे पुलावर मोठ्या प्रमाणात अपघात झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. पुलावरील हे खड्डे प्रशासनातर्फे तात्काळ बुजविण्यात यावे. अन्यथा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल. असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.