संतोष पवार
पळसदेव : दुचाकी वापरणार्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मात्र, वाहन चालवताना स्वतः व मागे बसलेल्यांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट घालण्याची शिस्त अद्यापही पाळली जात नाही. साधारणतः कुटुंबातील मुले पालकांच्या दुचाकीवर बसून शाळेत जातात. या मुलांच्या डोक्यावर हेल्मेट नसल्याने अपघात घडल्यास त्यांच्या जीवाला धोका होतो. यामुळे विद्यार्थी व पालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मोफत हेल्मेट वाटपाचे काम हे कौतुकास्पद असल्याचे मत बिल्ट ग्राफिक पेपर लिमिटेड कंपनीचे सीएसआर युनिटचे प्रभात रथ यांनी व्यक्त केले.
पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयातील विद्यार्थी व त्यांच्या पालकांना जवळपास १४ मोफत हेल्मेट शुक्रवार (ता. २३) वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग इंदापूर विभागाचे ठाणे अंमलदार नितीन राक्षे म्हणाले की, हे हेल्मेट फक्त ज्या पालकांकडे दुचाकी चालविण्याचा परवाना आहे. अशाच पालकांना व त्यांच्या मुलांना हेल्मेट वाटप करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी व पालकांनी रस्ता वाहतुकीचे नियमांचे पालन केले पाहिजे .
पळसदेव येथील ब्राईट लाईफ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ माने म्हणाले की, रस्ता सुरक्षेची सामाजिक जबाबदारी ओळखून ब्राईट लाईफ सामाजिक संस्थेकडून विद्यार्थी – पालकांना हेल्मेटचे मोफत वाटप सुरू आहे. पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे म्हणाले की, ब्राईट लाईफ सामाजिक संस्थचे काम विधायक असुन यापूर्वीही विद्यार्थ्यांना मोफत सायकली, विविध शालेय साहित्य वाटप करण्यात आले आहे. सदरच्या संस्थेकडून विद्यार्थी -पालकांसाठी सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणारे हेल्मेट वाटपाचा स्तुत्य उपक्रम असून पालकांनीही रस्ते वाहतुक रहदारीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
याप्रसंगी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भूषण काळे, पळसदेवचे सरपंच अंकुशराव जाधव, संस्थेचे सचिव योगिराज काळे, बिल्ट कंपनीचे प्रभात रथ, मदनवाडी येथील शंकरराव सोठपाटील बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सूरज सोठ, सचिव धीरज सोठ, महामार्ग ठाणे अंमलदार नितीन राक्षे, ब्राईट लाईफ संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ माने, सचिव सिद्धनाथ माने, पर्यवेक्षक संजय जाधव आदिंसह पालक, शिक्षक शिक्षकेत्तर विद्यार्थी उपस्थित होते.