पुणे: राज्याच्या काही भागांत जोरदार पाऊस पडत असून, काही ठिकाणी उन्हाबरोबर ढगाळ हवामान आहे. पुढील चार दिवस राज्याच्या काही भागांत ‘यलो’ अलर्ट असून येथे हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. कर्नाटक-गोवा किनारपट्टीवर पूर्वमध्ये अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागांत पाऊस पडत आहे. गुरुवारी मध्य महाराष्ट्रातील पुणे, लोहगाव, कोल्हापूर, महाबळेश्वर, नाशिक, सांगली, सातारा येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. कोकणातील रत्नागिरी, विदर्भातील चंद्रपूर, नागपूर येथे पावसाची नोंद झाली.
येत्या २३ ते २६ ऑगस्टदरम्यान कोकणातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार असून, काही भागात खूप जोरदार पाऊस पडणार आहे. किनारपट्टीवर वारे वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा व काही भागांत जोरदार पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला. काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचाही अंदाज देण्यात आला.
रायगड, ठाणे, पालघर, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया तसेच वाशिम येथे जोरदार पावसाचा इशारा आहे. राज्यात सर्वात जास्त तापमान ब्रह्मपुरी येथे ३५.६, तर सर्वात कमी तापमान महाबळेश्वर येथे १८.७ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले.