शिरूर : घराजवळील शाळेत चालू असलेल्या डीजेचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने मद्यधुंद अवस्थेतील शिक्षकांनी तरुणाला मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. २०) रामलिंग (ता. शिरूर) येथील बगाड रस्त्यावर असलेल्या सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घडली. सुमन सखाराम साळवे (वय ४४, रा.रामलिंग शिरूर, ता. शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी साळवे यांच्या बगाड रोड रामलिंग येथील घराशेजारी सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल आहे. मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास स्कूलमधून डीजे वाजण्याचा कर्कश आवाज येत होता. या आवाजाचा त्यांना त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी शाळेच्या गेटवर असलेल्या वॉचमनकडे याबाबत चौकशी केली होती. त्यामुळे वॉचमनते आतमध्ये याबाबत माहिती दिली. स्कूलमध्ये आतील व्यक्तींनी साळवे व त्यांच्या मुलाला आतमध्ये बोलावून घेतले. साळवे यांना १० ते १५ व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसले. सदर घटनेचे फिर्यादी चित्रीकरण करीत असताना प्रिन्सिपल ज्ञानसी पायस यांच्या तोंडास दारूचा वास येत होता. सुरेश चौगुले व अभिषेक जाधव यांनी जीवन याच्या हातातील मोबाइल घेत त्याला मारहाण केली.